शहरवासीयांची तहान भागवायला दररोज एक लाखाचा खर्च 

पानवल धऱणाकडे दुर्लक्षाची किंमत ; उपायांच्या फक्त वल्गना

रत्नागिरी:-शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पालिकेला दिवसाला १ लाख रुपये तर महिन्याला ३० लाख रुपये मोजावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. यामध्ये शीळ धरणाचे अडीचशे अश्वशक्तीच्या तीन विद्युत पंपांचे बिल, जलशुद्धीकरण केंद्राचे बिल आणि शीळ धरणाचा ताबा असलेल्या पाटबंधारे विभागाला पाणी वापराचे द्यावे लागणाऱ्या पैशाचा समावेश आहे. शहराला विनाखर्च ग्राव्हिटीने (नैसर्गिक  उतार) पाणी देणारे पानवल धरण अजून दुर्लक्षित आहे. धरणाची आजची परिस्थिती अतिशय विदारक आहे. प्रचंड गळती असून ते गाळाने भरलेले आहे.

शहराचा गेल्या पाच ते आठ वर्षांमध्ये मोठा विस्तार झाला आहे. त्यामुळे दिवसाला १२ एमएलडी ऐवजी आता २२ एमएलडी उचलले तरी शहरवासीयांची तहान भागत नाही. शहरात साडेनऊ हजार नळजोडणीधारक आहेत. वर्षाची पाणीपट्टी सुमारे साडेसहा कोटी आहे. मात्र गेल्यावर्षी पेक्षा यंदा सुधारित पाणी योजना झाल्यामुळे शहरातील पाणी वितरण व्यवस्था बरी आहे. शीळ धरणात मुबलक पाणी आहे. १५ जुनपर्यंत पाणी टंचाई भासणार नाही, अशा वल्गना करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात आठवडाभरापूर्वीच शहरात दिवसाआड पाणी सुरू
केले. शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी अनेक प्रयत्न केले. शीळची मुख्य जलवाहिनी नवीन टाकण्यात आली. २५० अश्वशक्तीचे ३ नवीन पंप शीळ जॅकवेलवर बसविण्यात आले. जलशुद्धीकरण केंद्रावर दोन कोटी खर्च करण्यात आले. पानवलची नवीन जलवाहिनी बसविण्याचे काम हाती घेतले. ७३ कोटीची सुधारित पाणी योजना कार्यान्वित झाली, तरी शहरवासीयांची तहान भागविण्यात पालिकेला अपयश आले आहे.
सत्ताधारी असो वा पालिका प्रशासन असो, पानवल धरणाच्या नैसर्गिक उताराचा फायदा कोणाला उठवता आलेला नाही. या धरणाकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. धरणाचा विचारच न झाल्याने आज शहरावर ही परिस्थिती आली आहे.