रत्नागिरी:- शरीराचे सौष्ठव वाढावे यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून शरीराला घातक ठरणारी वेगवेगळ्या कंपनींची इंजेक्शन्स् व औषध बेकायदेशीरपणे बाळगून ती विकणाऱ्या एका संशयिताला दहशतवाद विरोधी पथकाने ताब्यात घेतले. मिरजोळे एमआयडीसीत संशयिताच्या घरावर छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केली. संशयिताकडून सुमारे चार हजार किमतीची बेकायदेशीर साठा केलेली इंजेक्शन्स, औषधे जप्त केली आहेत. ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करून संशयिताला अटक केली आहे. साईराज रमेश भाटकर (वय २६, रा. एमआयडीसी, मिरजोळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, पथकाने काल सायंकाळी संशयित भाटकर यांच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली त्यावेळी त्याच्याकडे बेकायदेशीर इंजेक्शन व औषधाचा साठा मिळून आला. भाटकर यांच्याकडे औषध खरेदी व विक्रीसाठी परवाना नाही. तरीही औषधे आणि इंजेक्शन अनधिकृरित्या आपल्या घरी साठा करून विक्रीसाठी ठेवल्याचे निदर्शनास आले.