रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे आज दुपारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यापूर्वी जाहीर मेळावा घेऊन ना.राणे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेनेसह राष्ट्रवादी, भाजपा कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी आज नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून दुपारी 3 वाजता ही मुदत संपणार आहे. त्यापूर्वी सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याकडे दाखल करतील यावेळी उद्योगमंत्री ना. उदय सामंत, बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षणमंत्री ना.दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, आमदार शेखर निकम, आमदार योगेश कदम, माजी आमदार तथा लोकसभा सहाय्यक प्रभारी बाळासाहेब माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजन तेली, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, दादा दळी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
ना.राणे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपमार्फत शिवसेना, राष्ट्रवादी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी ना.राणे यांच्या उमेदवारीची घोषणा भारतीय जनता पार्टीमार्फत करण्यात आली. त्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोष केला होता. तर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आम्ही ना.राणे यांना विजयी करणार असा दावा केला आहे.