रत्नागिरी:- कोरोनावरील लसीकरण शंभर टक्के करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली असून 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहिम हाती घेतली आहे. शासनाकडून लसीचा पुरवठा वाढला आहे. सध्या आरोग्य विभागाकडे 1 लाख लसीच्या मात्रा उपलब्ध असून दोन लाख मात्रा मागवण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात 18 वर्षांवरील नागरिकांचे कोरोना लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 10 लाख 81 हजार 900 जणं पात्र आहेत. आतापर्यंत पहिला व दुसरा डोस घेतलेले 11 लाख 43 042 नागरिक आहेत. त्यात पहिला डोस 7 लाख 97 हजार 255 आणि दुसरा डोस 3 लाख 45 हजार 787 नागरिकांनी घेतला आहे. जिल्ह्याला शासनाकडून मोठ्याप्रमाणात लस मिळत आहे. सध्या एक लाख मात्रा उपलब्ध असल्याने शंभर टक्के नागरिकांना पहिला डोस पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यासाठी तालुका कार्यबल गटाच्या बैठका घेण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबरपासून ही मोहीम सुरु होईल. त्यासाठी तहसिलदार, गट विकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकारी बैठक घेतील. 18 वर्षावरील एकूण लाभार्थी, लसीच्या मात्रा घेतलेले यांची माहिती एकत्रित करुन लसीकरण सत्रांचे नियोजन केले जाईल. लोकप्रतिनीधीं, स्वयंसेवी संस्था, स्वसहाय्यता गट, विविध धर्माच्या धर्मगुरुंची मदत घेण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राकडून लसीकरणाचा आढावा घेऊन गावनिहाय लसीकरण सत्रे आयोजित करावयाची आहेत. नागरिकांना उद्युक्त करण्यासाठी सोशल मिडियावर प्रचार व प्रसार करावयाचा आहे.
प्रत्येक गावासाठी एक कोविड लसीकरण संनियंत्रण समिती स्थापन करुन त्यात सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, गावातील प्रतिष्ठित नागरीक यांचा समावेश राहील. तशीच समिती वॉर्डस्तरावर तयार केली जाईल. या समितीने सत्राची पूर्वतयारी, सत्राचे नियोजन व सत्राच्या दिवशी सनियंत्रण करावे.