खेड:- व्हेल माशाच्या उलटीच्या तस्करीत मुंबई पोलिस दलातील बडतर्फ कर्मचाऱ्याला झालेल्या अटकेची घटना ताजी असतानाच, ६ जुलै रोजी माणगाव तालुक्यातील लोणेरे येथे रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने रत्नागिरी येथून मोटारसायकलवर व्हेल माशाची उलटी विक्रीसाठी घेऊन जाणाऱ्या एकास जेरबंद केले. अब्दुल मुसालिब मोहम्मद जाफर सुर्वे (वय ४५, रा. खेड, रत्नागिरी) असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून पाच किलो वजनाची अंदाजे पाच कोटी रुपये किमतीच्या उलटीसह मोटारसायकल पोलिसांनी हस्तगत केली आहे.
रत्नागिरी येथून एक जण व्हेल माशाच्या उलटीच्या विक्रीसाठी रायगडात येणार असल्याची माहिती रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षक अशोक दुधे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश कदम यांनी संशयिताला ताब्यात घेतले. यासंबंधी गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, अधिक तपास पोलिस करीत आहेत. व्हेल माशाच्या उलटीचा वापर अतिउच्च प्रतीचा परफ्युम, काही औषधांमध्ये, तर काही ठिकाणी सिगारेट, मद्य तसेच, खाद्यपदार्थांमध्ये स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. याची खरेदी-विक्री हे वन्यप्राणी सुरक्षा अधिनियमांतर्गत बेकायदेशीर आहे.
भारतीय बाजारपेठेत या उलटीची किंमत पाच कोटी रुपये आहे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर अंदाजे वीस कोटी रुपये किंमत असल्याचे बोलले जाते. दुर्मिळ असलेल्या व्हेल माशाने खोल समुद्रात केलेली उलटी कालांतराने दगडासारखी बनते. यामध्ये आम्ब्रिन, म्ब्रोक्झिन, म्ब्रोनॉल ही रसायने असतात. -महेश कदम, पोलिस उपनिरीक्षक