व्यापाऱ्यांवरील विघ्न दूर! गणेशोत्सवात बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल 

रत्नागिरी:- कोरोनामुळे मागील दोन वर्षात व्यापार्‍यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. ते भरून काढण्यासाठी गेले वर्षभर प्रयत्न सुरू आहेत. त्यात यंदाच्या गणेशोत्सवाने रत्नागिरी शहरातील व्यावसायिकांना आधार दिला आहे. गणपती आगमनाच्या तयारीसाठी गेल्या चार दिवसात खरेदीकरिता नागरिकांनी बाजारपेठेमध्ये प्रचंड गर्दी केली होती. साधारणपणे एक कोटी रुपयांची उलाढाल झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर शासनाकडून बंधने उठवण्यात आली. त्यामुळे गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण आले होते. चाकरमानीही उत्सवासासाठी कोकणातील घरी दाखल झाले. त्यामुळे बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी प्रचंड गर्दी झालेली होती. आरतीसाठी ढोलकी, मिरवणुकीसाठी ढोल-ताशे, थर्माकॉलच्या मखरांवरील बंदी असल्यामुळे कागदापासून बनवण्यात आलेली विविध आकर्षक साहित्य, विजेच्या माळा यांना बाजारपेठांमध्ये प्रचंड मागणी होती. त्या पाठोपाठ कपड्यांची दुकाने, किराणा माल आणि फळांच्या दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत होती. शनिवारपासून (ता. २७) बाजारात रेलचेल सुरू झाली. सोमवारी आणि मंगळवारी रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेत म्हणजेच रामआळी, धनजीनाका या परिसरातील दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. पोलिसांनीही या परिसरातून वाहतूक बंद करून ठेवली होती. रत्नागिरी शहरातील या परिसरात छोटी-मोठी चारशेहून अधिक दुकाने आहेत. गणशोत्सवाच्या आगमनाला खरेदीसाठी झालेल्या गर्दीमुळे व्यावसायिक समाधानी होते. गणपतीसाठी सोन्याच्या दुकानातही गर्दी होती. सलग दोन दिवसांमध्ये पन्नास हजाराहून अधिक लोकांनी बाजारपेठेमध्ये हजेरी लावल्याचा अंदाज आहे. कोरोनानंतर प्रथमच व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.