व्यवसायासाठी कर्ज घेणार्‍या तरुणाला ठार मारण्याची धमकी; जयस्तंभ येथील घटना

रत्नागिरी:- ट्रॅव्हल्स व्यवसायासाठी सावकारी कर्ज घेतलेल्या एका व्यावसायिकाला दोघा संशयितांनी कर्ज वसुलीसाठी शिवागाळ व ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश नंदाने (वय ३३) व अमोल श्रीनाथ (वय ४५, दोघेही रा. कारवांचीवाडी, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना २२ डिसेंबर २०२३ ते ९ जुलै २०२४ या कालावधीत जयस्तंभ-रत्नागिरी येथे घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादी मंदार प्रवीण वारेकर (वय ३८, रा. गोडावून स्टॉप, नाचणे रोड, रत्नागिरी) यांचा टुर्स अॅड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांनी संशयित राजेश नंदाने यांच्याकडून १० टक्के व्याजाने दीड लाख रुपये कर्जावू घेतले होते. हे पैसे अमोल श्रीनाथ यांचे असल्याचे सांगून त्याला ही रक्कम देण्यास सांगितले.

त्यानंतर फिर्यादी यांनी ९१ हजार ५०० रुपये इतकी रक्कम दिली. त्यानंतरही संशयितांनी फिर्यादी यांच्याकडे अधिक व्याजाच्या रक्कमेची मागणी केली व शिविगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी फिर्यादी मंदार वारेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक शहर पोलिस अमंलदार करत आहेत.