व्यवसायाच्या आमिषाने 6 लाखाला गंडा; दोघांची फसवणूक

दापोली:- माय अर्निंग ॲपद्वारे वीज बिल, मोबाईल रिचार्ज, टीव्ही रिचार्ज करण्याचा व्यवसाय सुरु करण्याचे आमिष दाखवून दापोली तालुक्यातील लाडघरमधील दोन जणांची ६ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली असून संशयित प्रज्ञेश प्रकाश ताम्हणकर यांच्या विरोधात दापोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जबव्ही ट्रॅव्हल्स या कंपनीद्वारे दापोली येथिल एका हॉटेलमध्ये डिसेम्बर २०२० मध्ये एक सेमिनार घेण्यात आला होता. या सेमिनारमध्ये संशयित प्रज्ञेश ताम्हणकर याने जबव्ही ट्रॅव्हल्स ॲपची माहिती तसेच त्यापासून मिळणाऱ्या फायदयाची माहिती दिली होती. त्यानंतर प्रज्ञेश ताम्हणकर यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे लाडघर येथील तृप्ती बाळ या १ जानेवारी २०२१ पासून जबव्ही ट्रॅव्हल्स ॲपद्वारे मोबाइल रिचार्जचा व्यवसाय करू लागल्या. यासाठी बाळ या त्यांच्या खात्यातून ऑनलाइन पैसे वर्ग करत होत्या. त्यानंतर ताम्हणकर यांनी, बाळ यांच्या मोबाईलवर मेसेज केला तुम्ही, माझ्या खात्यात ५ लाख ५५ हजार रुपये वर्ग करा.

मी तुमच्या ॲप अकाउंटला ९९ हजार ९९९ चा जादा ब्यालंस देतो, तेव्हा बाळ यांनी, ३ लाख १६ हजार रुपये ऑनलाइन ताम्हणकर यांच्या खात्यात वर्ग केले. ताम्हणकर यांनी बाळ यांच्या जबव्ही ट्रॅव्हल्स ॲप खात्यात ५ लाख ७४ हजार ८३६ रूपयांचा बॅलन्स जमा केला. यानंतर या ॲपमध्ये तांत्रिक अडचणी येऊ लागल्या व काही दिवसांनी हे ॲप पूर्ण बंद झाले. तेव्हा बाळ यांनी ताम्हणकर यांच्याशी संपर्क साधला. ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले.

बाळ यांनी दापोली येथे सेमीनारला आलेल्या गावातीलच अभिनय कर्देकर याचेशी संपर्क साधला असता, त्याचीही याच ॲपद्वारे २ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याची बाब पुढे आली. त्यामुळे बाळ यांनी संशयित प्रज्ञेश ताम्हणकर (रा. बेंडवाडा हाउस, सांगे, गोवा) याच्या विरोधात दापोली पोलीस ठाण्यात फसवंणुकीची तक्रार दाखल केली. संशयित प्रज्ञेश ताम्हणकर याचे विरोधात फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरु आहे.