चिपळूण:- शहरातील काविळतळी येथील एका महिलेला कुंभार्ली येथील एका कुटुंबाने व्यवसायाची आमिषे दाखवून तिच्याकडून तब्बल 75 तोळे सोन्याचे दागिने हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात चारजणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील एकाला अटक केली आहे. त्याच्याकडून 10 तोळे सोने हस्तगत करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.
लुबना राहिल अत्तार(रा.काविळतळी, चिपळूण)यांनी चिपळूण पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे. तर रजिया कुंभार्लीकर, तरबेज कुंभार्लीकर, तन्वीर कुंभार्लीकर व अलीसाहब कुंभार्लीकर (सर्व राहणार कुंभार्ली)अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुबना अत्तार या शहरातील काविळतळी येथे राहतात. त्यांचे पती नोकरीनिमित्त परदेशात असतात. कुंभार्ली येथील रजिया, तरबेज, तन्वीर व अलीसाहब कुंभार्लीकर हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत. कुंभार्ली येथे आपल्या मालकीची जमिन असून त्यावर उद्योग व्यवसाय उभा करायचा आहे. मात्र त्यासाठी आर्थिक मदतीची गरज असून ती आपण करावी, अशी मागणी या कुटुंबाने लुबना अत्तार यांच्याकडे केली होती. मात्र पैसे मिळत नसल्याने अखेर या कुंभार्लीकर कुटुंबाने लुबना हिला विविध आमिषे दाखवून तसेच गोड बोलून वेळोवेळी सोन्याचे दागिने घेतले.ही घटना 2018 मध्ये घडली होती. दोन वर्षे झाली तरी कुंभार्लीकर कुटुंबाने लुबना यांना दागिने परत केले नाहीत. त्यांच्याकडे दागिन्यांची वारंवार मागणी करूनही चालढकल केली जात असल्याने आपली फसवणूक झाल्याचे लुबना यांच्या लक्षात आले.
अखेर दि.26 सप्टेंबर 2020 रोजी लुबना अत्तार यांनी चिपळूण पोलीस स्थानक गाठत आपली तक्रार दिली. त्यानुसार या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत झगड करीत होते. आपल्या तपासाला गती देत श्री.झगडे यांनी यातील संशयित आरोपी अलीसाहब कुंभार्लीकर यांना अटक करत त्याच्याकडून 75 तोळे सोन्यापैकी 10 तोळे सोने हस्तगत केले असल्याचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी सांगितले. तर उर्वरित तीन संशयित आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री.झगडे करीत आहेत.