वैद्यकीय बिले ही पैसे खायचे दालन नाही

संतप्त झालेल्या पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना सुनावले

रत्नागिरी:- वैद्यकीय बिले अनेक महिने, वर्षवर्ष तटवून ठेवायची, आपल्या व नातेवाईकांच्या आजाराने अनेकजण त्रस्त असतात, अशांना बिलासाठी ‘हॅरेसमेंट’ करायची, हे काही पैसे खायचे दालन नाही, अधिकारी आपल्या खिशातील पैसे देत नसतो. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत बिलांची पूर्तता झाली पाहिजे असा सज्जड दम पालकमंत्री उदय सामंत यांनी अधिकार्‍यांना दिला.

जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचार्‍यांच्या प्रलंबित असणार्‍या वैद्यकीय बिलांबाबत माहिती घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा परिषदेत बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती किरण पुजारा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. फुले यांच्याकडे प्रलंबित वैद्यकीय बिलांबाबत माहिती उपलब्ध नसल्याने, ना. सामंत यांनी त्यांना धारेवर धरले. शासकीय रुग्णालयात प्रलंबित असणारी बिले कोणत्या कारणामुळे प्रलंबित आहेत, याबाबत त्या योग्य माहिती देऊ शकल्या नाहीत. त्याचप्रमाणे वैद्यकीय बिलांचे काम पाहणार्‍या कर्मचारी बाहेर गेल्याची माहिती दिली. त्यानंतर ना. सामंत यांनी संबंधित कर्मचार्‍यांशी मोबाईलवर संपर्क करीत त्यांना तातडीने सर्व प्रकरणे कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहेत याची माहिती घेऊन सायंकाळपर्यंत हजर राहण्याच्या सूचना केल्या.

जिल्हा परिषद आरोग्य विभाग, बांधकाम विभागाशी संबंधित वैद्यकीय बिलांचाही ना. सामंत यांनी आढावा घेतला व अधिकार्‍यांना चांगलेच सुनावले. वैद्यकीय बिले हे पैसे खायचे दालन नाही. स्वत: किंवा घरातील व्यक्ती आजारी असेल तर माणूस कोणत्या प्रसंगातून जात असतो याचा विचार करा व कुठेतरी माणुसकी ठेवा अशा शब्दात सुनावले. आज शनिवार असला तरी कोण कुठे असेल त्यांना बोलावून घ्या आणि सायंकाळपर्यंत वैद्यकीय बिलांचा निपटारा करा अशा स्पष्ट शब्दात कान उघडनी केली.
वैद्यकीय बिले असणार्‍या काही लोकांना अधिकार्‍यांनी तक्रारीसाठी येऊ नये अशी तुजविजही केली होती. आपल्याकडे अधिकार्‍यांशी चर्चेचे रेकॉर्डिंगही असल्याचे ना. सामंत यांनी सांगितले.