वैद्यकीय बिलांचे रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवल्याप्रकरणी आरोग्य विभागातील आरोग्य सेवकाचे निलंबन

रत्नागिरी:- कर्मचार्‍यांच्या प्रलंबित वैद्यकीय बिलांचे रेकॉर्ड व्यवस्थित न ठेवल्याप्रकरणी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील आरोग्य सेवकाला मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी निलंबित केले आहे. याला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांनी दुजोरा दिला.

पालकमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी (ता. 1) वैद्यकीय बिलांसंदर्भात जिल्हापरिषदेमध्ये आढावा बैठक घेतली होती. यावेळी जिल्हा आरोग्य विभागासह जिल्हा शल्य चिकित्सकांनाही बोलावण्यात आले होते. यावेळी कर्मचार्‍यांच्या प्रलंबित बिलांविषयी संबंधित विभागांकडून योग्य माहिती देता आली नव्हती. मंत्री सामंत यांनी तिव्र नाराजी व्यक्त करत बिले प्रलंबित ठेवू नका असे आदेश काढले. जिल्हापरिषदेच्या सर्व विभागाकडील वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांची वैद्यकिय देयके तपासणीची जबाबदारी जिल्हा परिषद आरोग्य विभागात कार्यरत आरोग्य सेवकाकडे देण्यात आली होती. संबंधित कर्मचार्‍याने मोठयाप्रमाणावर वैदयकीय देयके प्रलंबित ठेवल्याची बाब तसेच वैद्यकिय देयक वॉच नोंदवही ठेवली नव्हती. त्यांच्या कार्यासनाचे कपाट सहा गठ्ठे पध्दतीनुसार न ठेवता अस्ताव्यस्त स्वरुपात ठेवलेले होते. विभागाकडे किती देयक प्राप्त झाली, त्यापैकी किती देयकांचा निपटारा झाला आणि किती प्रलंबित आहेत, याचाही ताळमेळ संबंधित कर्मचार्‍याला देता आला नाही. तसेच अनेक कर्मचार्‍यांची वैद्यकिय देयकेही प्रलंबित राहिल्याचे निदर्शनास आले. कार्यालयीन कामकाज करताना कोणतीही फाईल विभागातील कार्यालयाच्या कोणत्याही कर्मचार्‍याकडे सात दिवसांपेक्षा प्रलंबित राहाणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र त्याची योग्य पध्दतीने अंमलबजावणी त्या कर्मचाऱ्याने केलेली नाही. त्यामुळे संबंधित टेबलच्या आरोग्य सेवकाला कामाचा निपटारा न केल्यामुळे निलंबित करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी काढले. त्या कर्मचार्‍यावरील पुढील कारवाई सीईओंच्या आदेशाने केली जाणार असल्याचे डाॅ. आठल्ये यांनी सांगितले.