रत्नागिरी:- जिल्हा परिषदेतील प्रलंबित असलेल्या कर्मचार्यांच्या बदल्यांचे वेळापत्रक गेल्या आठवड्यात जाहीर झाले. सोयीच्या जागेवर बदली व्हावी यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता लक्षात घेता ते मिळविण्यासाठी कर्मचारीवर्गाची धावपळ सुरू झाली आहे. त्यासाठी अनेक कर्मचारी जिल्हा रुग्णालयाचे उंबरठे झिजविताना दिसत आहेत. याबाबत 100 पेक्षा जास्त अर्ज जिल्हा रुग्णालयास प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. या बदली प्रक्रियेत जिल्हा परिषद सीईओ काय काळजी घेतात याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी राज्यात काही जिल्ह्यात पोलिस दलात बनावट प्रमाणपत्र जोडून अनेक कर्मचार्यांनी बदलीचा लाभ घेतल्याचे उघड झाले होते. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक या दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश असल्याने संपूर्ण राज्यात हा चर्चेचा विषय ठरला होता. त्यानंतर या घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेत अशा प्रकारे बदल्या झाल्याचा संशय व्यक्त झाला होता.
कोरोना संकटामुळे दोन वर्षे कर्मचार्यांची बदली प्रक्रिया होऊ शकली नव्हती. गेल्या वर्षी आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील असमतोल ढासळला जाईल, असे कारण पुढे करत कर्मचारी बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. यंदा मात्र, बदल्यांची प्रतीक्षा कर्मचारीवर्गास लागली होती. जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने गेल्या आठवड्यात कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार येत्या 11 मे ते 12 मे दरम्यान ही बदली प्रक्रिया पार पडणार आहे. बदल्यांमध्ये प्रामुख्याने मुख्यालयावर बदली होऊ नये, यासाठी काही कर्मचार्यांचा आग्रह असतो. त्यासाठी या कर्मचारी वर्गाकडून कर्मचारी संघटनेचा तर काही कर्मचार्यांकडून वैद्यकीय प्रमाणपत्राचा आधार घेतला जातो. यात दुर्धर आजार दाखवून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविले जाते. यामध्ये दुर्धर आजार असलेले कर्मचारी आहेत, त्यांना प्रमाणपत्राची गरज असते. यासाठी अनेकदा कर्मचार्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवित सोयीच्या ठिकाणी बदल्या करून घेतल्या असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. त्यावर प्रमाणपत्रांच्या पडताळणीचा निर्णय झाला. मात्र, पुढे त्यावर काहीही झालेले नाही. दरम्यान, यंदाही कर्मचारी बदल्यांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली असल्याचे बघावयास मिळत आहे.