रत्नागिरी:- शहरातील सिद्धीविनायक नगर येथे वेश्याव्यवसाय चालविल्याचा आरोप असलेल्या मुख्य संशयित आरोपीचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. राजेंद्र रमाकांत चव्हाण (45, रा जांभूळफाटा रत्नागिरी) असे या आरोपीचे नाव आहे. नुकतेच इतर आरोपींची जामीनावर मुक्तता झाली होती. यानंतर मुख्य आरोपी असलेल्या राजेंद्र याने देखील सत्र न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज दाखल केला होता मात्र न्यायालयाने त्याला जामीन देण्यास नकार दिला.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबाळकर यांनी या जामीन अर्जावर निकाल दिला. राजेंद्र याच्या जामीन अर्जावर युक्तिवाद करताना त्याच्या वकिलांनी न्यायालयापुढे सांगितले की, राजेंद्र याला चुकीच्या पद्धतीने या सर्व प्रकरणात गुंतविण्यात आले आहे. त्याचा गुन्ह्यामध्ये कोणताही सहभाग नाही. त्याच्या घरामधील तो एकमेव कमावता आहे तसेच तो रत्नागिरी मधील वास्तव्यास असून तो कोठेही पळून जाणार नाही व न्यायालयाने घालून दिलेल्या सर्व अटी व शर्थीचे तो पालन करेल, असे न्यायालयापुढे सांगण्यात आले.
सरकारी पक्षाकडून जामीन अर्जाला विरोध करताना सांगितले की, पिडीत महिला व राजेंद्र यांच्यात अनेक वेळा मोबाईलवरून संभाषण झाल्याचे तपासात उघड झाले आहे. राजेंद्र हा पिडीत महिला व इतर आरोपी यांच्यात सातत्याने संपर्कात होता तसेच तो संबंधित फ्लॅटवर वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे समोर आले आहे. राजेंद्र हा रिक्षाचालक असून त्याचे मोबाईलवरील संभाषण व ऑनलाईन झालेले पैशाचे व्यवहार हे वेश्याव्यवसाय चालविण्यासाठीच झाले असल्याचे तपासात समोर आले आहे. आरोपीचा गुन्हेगारीचा पूर्वइतिहास असून त्याला जामीन अर्ज मंजूर झाल्यास तो पिडीत महिला व साक्षिदार यांना धमकावेल तसेच तपास कामात अडथळा निर्माण करू शकतो, असे सरकार पक्षाकडून न्यायालयापुढे सांगण्यात आले.
न्यायालयाने जामीन अर्जावरील निकालात सांगितले की, आरोपी हा रिक्षाचालक असून त्याचे व पिडीत महिलांचे फोन कॉल्स दिसून येत आहेत तसेच त्याच्या खात्यामध्ये ऑनलाईन पेमेंट झाले असल्याचे पोलिसांच्या तपासात आढळले आहे. अद्याप पोलिसांचे तपास काम पूर्ण झाले नसल्याने आरोपीला जामीन देणे योग्य ठरणार नाही, असे नोंदवत न्यायालयाने आरोपी राजेंद्रचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
गुन्ह्यातील माहितीनुसार, शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी-सिध्दिविनायक नगर येथील एका फॅल्टमध्ये दोन तरुणींचा वापर करुन वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 20 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास छाटा टाकला होता. यावेळी संशयित आरोपी राजेंद्र चव्हाण हा वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यानुसार मुख्य संशयित आरोपी राजेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती तसेच वेश्या व्यवसाय चालविल्याप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र याचे साथीदार समीर लिंबुर (23, साडवली देवरूख), श्रीमंत चंद्रम पूजारी (55, ऱा फणसोप सडा मुळ रा कर्नाटक), स्वप्नील बाळकृष्ण इंदुलकर (40, रा रेल्वेस्टेशन रत्नागिरी), रोहन मंगेश कोळेकर (30, रा सिद्धीविनायक नगर रत्नागिरी), अरबाज अस्लम चाऊस (25, रा साखरतर रहमत मोहल्ला, रत्नागिरी) व साई पसाद साळुंखे (21, रा कोकणनगर रत्नागिरी) यांच्याविरूद्धही गुन्हा दाखल केला.