दापोली:- दापोलीत प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढणाऱ्या नेहा बागकरची प्रेम कहाणी मंडणगड तालुक्यातील वेळास येथील एसटीच्या ‘लास्ट स्टॉप’ पासून सुरु होऊन आता तुरुंगापर्यंत जाऊन पोहोचली आहे. शनिवारी या दोन आरोपीना घेऊन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यांनी कोणत्या पद्धतीने खून केला, याचा प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपास केला.
पोलिसांच्या तपासानुसार, नेहा बागकर हिचे माहेर मंडणगड तालुक्यातील वेळास येते. तिचा प्रियकर मंगेश चिंचघरकर हा एसटीत मंडणगड आगारात चालक. तो नेहमी मंडणगड वेळास गाडी घेऊन वेळास येथे जात असे. बहुतांश वेळा वेळासला जाताना ती गाडी शेवटची असे. यामुळे ती गाडी शेवटच्या स्टॉपला वस्तीला असे. तिथून ती सकाळी मंडणगडला पुन्हा येत असे या लास्टस्टॉप जवळ नेहा बागकरचे माहेर. यामुळे मंगेश चिंचघरकर व राज्य परिवहन मंडळातील लास्टटॉपला मुक्कामी असणारे कर्मचारी यांचे बागकर कुटुंबियांच्या घरी जाणे-येणे असायचे, यामुळे मंगेशशी तिची ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मात्र तिचा पती नीलेश बागकरला हे प्रेम प्रकरण कळले. यानंतर नेहा व नीलेश यांच्यात खटके उडत होते. आपल्या प्रेमसंबंधात पतीचा अडथळा आहे, असे समजून तिने मंगेश या प्रियकराला हाताशी धरून आपल्या पतीचा काटा काढण्याचे ठरवले. आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. यानंतर त्याचा मृतदेह हर्णे येथे खून केलेल्या घटनेपासून ३३ कि.मी. लांब असणाऱ्या पालगड पाटीलवाडीतील विहिरीत कमरेला लोखंडी पाटा लावून ढकलून दिला. मंगेश व नेहाला वाटले की, लोखंडी पाटा लावल्यामुळे मृतदेह तळाला जाईल व ते कधीही पाण्यावर येणार नाही. मात्र त्यांचा अंदाज चुकला व नीलेशचा मृतदेह २ दिवसांनी पाण्यावर आला व सारे भिंग फुटले. नेहा ही ज्या हॉटेलमध्ये कामाला होती, ते हॉटेल दापोली-हर्णे रस्त्यालगत आहे. या हॉटेलमध्ये पर्यटकांची नेहमी वर्दळ असते. यामुळे पर्यटकांचे जेवण वगैरे झाल्यावर सर्व कामे आटपून ती रात्री ११.३०च्या सुमारास घरी परतत असे. मात्र ज्या दिवशी. तिने आपल्या पतीचा काटा काढायचे ठरवले होते, त्या दिवशी ती सायं. ४ वा. आपल्या रिसॉर्टमधून बाहेर पडली. हीच वेळ तिच्यासाठी पोलिसांना संशय ठरली. तिने पोलिसांना आपला पती बेपत्ताच्या दिलेल्या तक्रारीत दिलेली वेळ व ती हॉटेलमधून बाहेर पडलेली वेळ यामध्ये बरीच तफावत होती. यामुळे पोलिसांचा संशय बळावला. शिवाय ती ज्या रिसॉर्टमध्ये काम करते, त्या रिसॉर्टमधील कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती, तेथील सीसीटीव्ही फुटेज व नीलेश व मंगेश यांनी हर्णेतील ज्या बियर शॉपीत बियर खरेदी केली, त्या शॉपीमधील सीसीटीव्ही फुटेजमुळे या गोष्टीला दुजोरा मिळाला आणि मंगेश व नेहाला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले. या बिअर शॉपीमध्येही शनिवारी पोलिसांनी आरोपीला नेऊन घटनेची खातरजमा केली. सध्या मंगेश व नेहा दोघेही पोलीस कोठडीत आहेत. त्यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली. या पोलीस कोठडीत त्यांच्याकडून आणखी काही खुलासे होतात का? खून करण्याचे नेमके कारण काय? खून मंगेश व नेहा या दोघांनी केला की त्यांच्या सोबतीला आणखीन कोणी होते? या बाबत पोलीस दापोली पोलिसांनी जप्त केलेली वॅगनार गाडी तपास करत आहेत. शिवाय नीलेशचा खून हर्णेत केल्यावर त्यांना त्याचा मृतदेह ३३ किलोमीटर लांब पालगड येथील विहिरीत नेऊन टाकण्याचे कारण काय? याचाही पोलीस तपास करत आहेत.
हर्णे ते पालगड या प्रवासात संशयित मंगेश चिंचघरकर व नेहा बागकर यांनी नीलेशचा मृतदेह वाहून नेण्यासाठी वापरलेली वॅगनार गाडी पोलिसांनी जप्त केली. मात्र ही गाडी मंगेश चिंचघरकर यांच्या नावे नाही. या गाडीचा मूळ मालक कोण आहे? याचाही पोलीस तपास करत आहेत.