खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर वेरळ येथे भोस्ते घाटाच्या पायथ्याशी खासगी आराम बस आणि मोटार यांच्यात झालेल्या धडकेत मोटारचालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथून मुंबईला जाणारी खासगी आराम बस (एमएच-०१-सीव्ही-४२७८) ही भोस्ते घाट उतरून वेरळ येथे स्वरूप ढाबा या ठिकाणी आली असता समोरून येणाऱ्या मोटारीला (एमएच १२ व्हीएफ ३८५९) धडकली. या अपघातात कारचालक गंभीर जखमी झाला असून, उपचारासाठी चिपळूण येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. महामार्गावर खवटी ते धामणदिवी या सुमारे ४४ कि.मी. टप्प्याचे चौपदरीकरणाचे काम जवळपास
पूर्णत्वास गेले असले तरी अद्यापही खेड रेल्वेस्टेशन परिसरासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणची कामे अपूर्ण आहेत. याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. रेल्वेस्टेशन फाटा ते भोस्ते घाटाचा पायथा या सुमारे ५०० मीटरच्या अंतरात खोपीफाटा येथील एका लेनचे चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने सुरू असून, अद्यापही अपूर्णावस्थेत आहे. त्यामुळे चिपळूणहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहने घाट उतरून वेगाने येताना अचानक मार्गिका बंद असल्याचे लक्षात आल्यावर वाहनचालकांची भंबेरी उडते. या अपघातातदेखील आरामबस घटनास्थळी आल्यानंतर चालकाने ब्रेक दाबून गाडी दुसऱ्या लेनला घेतल्यानंतर समोरून येणाऱ्या कारचालकाला ही आराम बस धडकली आहे. या प्रकरणी अद्यापही खेड पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही..