वृध्दावर कोयतीने वार करणाऱ्या तरुणाला न्यायालयीन कोठडी

चिपळूण:- थकलेले घरभाडे मागितल्याच्या रागातून तरुणाने वृद्धवर कोयतीने वार केल्याची घटना 10 जानेवारी रोजी घडली होती. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. हल्ल्यानंतर त्या वृध्दाच्या गळ्यातील 75 हजाराची चैनदेखील त्या तरुणाने चोरली. आदित्य महादेव मोरे (मुळ-गुढे, सध्या मार्गताम्हाने-उगवतवाडी) अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याची पोलिस कोठडी संपल्याने पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

सविस्तर वृत्त असे की, चंद्रकांत चव्हाण हे मार्गताम्हाने- उगवतवाडी येथे एकटेच राहतात. त्यांनी आपल्या खोलीत महादेव मोरे व त्यांचा मुलगा आदित्य मोरे यांना भाड्याने ठेवले होते. महादेव मोरे यांच्याकडून चंद्रकांत चव्हाण यांना 18 हजार रुपये भाडे येणे होते. त्यातील 4 हजार रुपये घरभाडे मिळाले. उर्वरित 14 हजार रुपये घरभाडे येणे बाकी होते. महादेव मोरे हे त्याचे मुळ गाव गुढे येथे राहत असताना त्याच्या खोलीमध्ये आदित्य हा एकटाच राहतो. 10 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आदित्य मोरे हा चंद्रकांत चव्हाण यांच्या घरी गेला आणि रागाच्या भरात चव्हाण यांच्या घरातील कोयतीने त्यांच्या डोक्यात हल्ला केला. यानंतर चव्हाण गंभीर जखमी झाले. ते विव्हळत असताना आदित्यने त्यांच्या गळयातील 75 हजार रूपये किंमतीची सोन्याची चेन चोरुन नेली.

या घटनेनंतर चव्हाण यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आदित्य याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपताच पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.