आर्थिक देवघेवीतून खून; आरोपीला बेड्या
खेड:- तालुक्यातील होडकाड येथे वजनदार वस्तूने डोक्यावर प्रहार करून प्रौढाचा खून करणाऱ्या आरोपीला खेड पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले आहे. रुपेश शिगवण असे या 26 वर्षीय आरोपीचे नाव असून तो त्याच गावातील आहे. आरोपीला पकडण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलातील माही या श्वानाने महत्वाची भूमिका बजावली. आर्थिक देवाण-घेवाणीवरून हा खून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
होडकाडवरची वरची वाडी येथील नारायण शिगवण या 50 वर्षीय प्रौढांचा मंगळवारी रात्री खून झाला होता. पोलिसांना त्याचा मृत्यूदेह होडकाड एसटी स्टॉप पासून 50 मीटर अंतरावर जंगलमय भागात आढळून आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घ्यायला सुरवात केली होती. या कामी पोलिसांनी रत्नागिरी पोलीस दलातील माही या श्वानांची मदत घेतली होती. नारायण शिगवण याचा मृतदेह ज्या ठिकाणी पडला होता त्या ठिकाणी माही ला नेल्यानंतर माही ने थेट आरोपीचे घर गाठले होते. तिथेच पोलिसांनी या खुनाचा छडा लावला होता. पोलिसांनी तात्काळ या घरातून रुपेश शिगवण याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसांनी खास पोलीसी पद्धतीने चौकशी करायला सुरुवात केल्यानंतर त्याने नारायण शिगवण याच्या डोक्यात , गुप्तांगावर, तोंडावर काठीने प्रहार करून त्याला यमसदनी पाठवल्याची कबुली दिली. या हत्येमागेचे कारण पैश्यांची देवाण-घेवाण असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. पोलिओमुळे अपंग असलेले नारायण शिगवण हे गाव व परिसरातील नागरीकाकांना आवश्यक असणारे शासकीय दाखले काढून देणे, पंचायत समिती, महसूल विभागाशी संबंधित असलेली कामे करून देत असत. आरोपी रुपेश यांच्याकडूनही त्यांनी त्यांच्या आजोबांचा दाखल काढून देण्यासाठी दहा हजार रुपये घेतले होते. चार वर्ष उलटून गेली तरी नारायण शिगवण यांनी रुपेश याला हवा असलेला दाखल दिला नव्हता. नोकरीसाठी मुंबईला असलेला रुपेश हा लॉकडाउन मुळे सध्या गावी आला आहे. गावी आल्यापासून त्याने नारायण शिगवण यांच्याकडे दाखल्यासाठी भुणभुण लावली होती. मात्र नारायण याने त्याच्याकडे पुन्हा चार हजार रुपयांची मागणी केली. दाखल्याची आवश्यकता असल्याने रुपेश याने नारायण यांना आणखी चार हजार रुपये दिले. मात्र तरीही रुपेश याला दाखल मिळाला नाही. मंगळवारी रुपेश आणि नारायण यांची होडकाड एसटी स्टॉप येथे गाठ पडली. तेव्हा रुपेश याने नारायण यांना दाखल्याबाबत विचारले. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या दरम्यान रुपेश याचा राग अनावर झाल्याने त्याने हातातील काठीने नारायण यांच्यावर प्रहार केला. हा प्रहार नारायण याच्या वर्णी बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रुपेश याने नारायण याला एसटी स्टॉप वरून ओढत जंगलमय भागात नेले. तिथेही त्यांच्या गुप्तांगावर आणि तोंडावर काठीने प्रहार केले. नारायण हा मेल्याची खात्री झाल्यावर रुपेश हा घरी आला. तपासादरम्यान पोलिसांच्या माही श्वानानाने रुपेश याचेच घर पोलिसांना दाखवले आणि रुपेश पोलिसांच्या हाती लागला. ग्रामीण भागात झालेल्या खुनाचा केवळ काही तासातच छडा लावणाऱ्या खेड पोलिसांचे कौतुक होत आहे. खेडचे उवविघगीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खेडच्या पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करीत आहेत.