वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

 थिबा पॅलेस येथील घटना; गुन्हा दाखल

रत्नागिरी:- थकित विजबिलांच्या वसूलीची नोटीस देण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍याला रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस येथील एका व्यावसायिकाने दमदाटी करत मारहाण केल्याचा प्रकार पुढे आला आहे. या प्रकरणी व्यवसायिकासह कामगाराला पोलिसांनी अटक केली आहे.

कोरोनानंतर महावितरण कंपनीकडून दहा महिन्याच्यावर थकित राहीलेल्यांची विज बिले वसुलीसाठी पावले उचलली आहेत. वसुलीपुर्वी विजबिले भरा अशा सुचना देण्यासाठी नोटीस बजावण्याचे काम महावितरणकडून सुरु झाले आहे. शनिवारी (ता. 6) महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ शंकर शिवाजी राठोड हे वसुलीची नोटीस देण्यासाठी थिबापॅलेस येथे संजय खोपकर यांच्या डेअरीजवळ गेले होते. त्यावेळी तेथील कामगाराने मालक नाहीत, आम्ही नोटीस घेणार नाही असे सांगितले. नोटीस न देताच राठोड परतले. रविवारी (ता. 7) सकाळी 11 वाजता नोटीस देण्यासाठी पुन्हा गेले. त्यावेळी डेअरीचे मालक श्री. खोपकर यांनी शंकर राठोड यांना खोलीत बोलावून घेतले. बारा महिन्याचे एक लाख 23 हजार रुपयांचे विजबिल थकित असल्याची माहिती दिली. यावरून खोपकर यांनी कर्मचार्‍याला दमदाटी करत मारहाण केली.  हा प्रकार तंत्रज्ञ राठोड यांनी ही गोष्ट वरीष्ठांपुढे मांडली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शहर पोलीस ठाण्यात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून डेअरी मालक खोपकर यांच्यासह कामगाराला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.