रत्नागिरी:- मांडवी आणि भाट्ये समुद्रकिनारी विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणारे वाद्यांची वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश बंद करण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी यांनी जारी केले आहेत.
शनिवार ७ सप्टेंबर रोजी गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर ८ सप्टेंबरला दीड दिवस, १२ सप्टेंबर रोजी पाच दिवसांचे गौरी गणपती विसर्जन केले जाते. या दिवशी अन्य वाहनांना किनारी भागात प्रवेश बंद करण्याबाबतचे आदेश अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या दिवशी भुते नाका ते मांडवी समुद्र किनारा या दरम्यान विसर्जन ठिकाणी गणपती मूर्ती घेऊन येणाऱ्या वाहनांव्यतिरिक्त व गणपती विसर्जनासाठी सोबत असणारे वाद्यांचे वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. तसेच भाट्ये बस स्टॉप येथून भाट्ये समुद्र किनाऱ्याकडे जाणारा रस्ता सुध्दा एकेरी असल्यामुळे गणपती विसर्जनासाठी गणपती ठेवलेल्या वाहनांव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारच्या दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहनांना प्रवेश बंद केला आहे.