रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या नियुक्त्या नुकत्याच जाहीर करण्यात आल्या. या यादीत रत्नागिरीतील युवा उद्योजक आणि शेवसेनेचे पदाधिकारी सौरभ मलुष्टे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योगमंत्री ना. उदय सामंत, उद्योजक भय्या सामंत आणि शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांमुळे या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याचे सौरभ मलुष्टे यांनी सांगितले.
युवा उद्योजक सौरभ मलुष्टे हे सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिले आहेत. उद्योग क्षेत्रात काम करत असताना सामाजिक कार्यात त्यांनी वेळोवेळी आपले योगदान दिले आहे. उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या राजकीय कार्याने प्रेरित होऊन त्यांनी राजकीय क्षेत्रात वाटचाल सुरू केली. शिवसेनेने त्यांच्या खांद्यावर शहर संघटक पदाची जबाबदारी टाकली. सौरभ मलुष्टे यांनी साळवी स्टॉप येथे मोफत पाणपोई सुविधा सुरू केली. या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचन कट्टा सुरू केला. साळवी स्टॉप भागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला. सध्या त्यांनी प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार कचरा व्यवस्थापन आणि विल्हेवाट याचे नियोजन सुरू केले आहे.
सौरभ मलुष्टे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या खांद्यावर विशेष कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ही नियुक्ती मिळाल्यानंतर नागरिकांच्या सेवेसाठी आपण चोवीस तास हजर राहू असे मलुष्टे यांनी सांगितले. याशिवाय प्रभागातील वृद्ध आणि विद्यार्थ्यांसाठी घरी जाऊन सत्यप्रती करून देण्याचे काम करू असेही त्यांनी सांगितले. मिळाले पद हे जनतेच्या सेवेसाठी असून या पदाच्या माध्यमातून जनतेची सेवाच करू. ही संधी ना. सामंत, उद्योजक भय्या शेठ सामंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बाबू म्हाप, शहर प्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हाप्रमुख शिल्पाताई सुर्वे, कांचन नागवेकर, स्मितल पावसकर यासह शिवसेनेतील ज्येष्ठ पदाधिकारी यांच्यामुळे मिळाल्याचे मलुष्टे यांनी सांगितले.