विवाहितेला त्रास दिल्याप्रकरणी सहआरोपीला तीन दिवस कोठडीसह सात हजारांचा दंड

रत्नागिरी:- विवाहितेला सतत फोन करुन तसेच वाटेत अडवून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्या प्रकरणातील सह आरोपीला न्यायालयाने बुधवारी 3 दिवस पोलिस कोठडी आणि 7 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या गुन्ह्यातील मुख्य आरोपीचा मृत्यू झाला आहे. ही घटना 30 नोव्हेंबर 2012 रोजी रात्री 8.45 वा.खेडशी येथे घडली होती.

याबाबत पिडीत विवाहितेने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.त्यानूसार,या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मनोज नारायण तांबे (26,रा मांडवी,रत्नागिरी) हा पिडीतेला वारंवार फोन करुन मला भेटायला ये असे सांगायचा. 30 नोव्हेंबर 2012 रोजी मनोजने पारस नगर खेेडशी येथे पिडीतेला रस्त्यात अडवून माझ्या गाडीवर बस फिरायला जाउया असे म्हणून अश्लिल भाव करुन तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. काही वेळाने त्याचा सहकारी मित्रही त्याठिकाणी आला होता. त्यामुळे या बाबत पिडीतेने दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.हा खटला न्यायालात सुरु होता.

दरम्यान यातील मुख्य आरोपी मनोजचा मे महिन्यात मृत्यू झाला.बुधवारी या खटल्याचा निकाल देताना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.प्रज्ञा तिवरेकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून सह आरोपीला 3 दिवस पोलिस कोठडी आणि 7 हजार रुपयांचा दंड सुनावली.यात 4 साक्षिदार तपासण्यात आले असून पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड काँस्टेबल दुर्वास सावंत आणि संजीवनी मोरे यांनी काम पाहिले.