विल्येच्या माजी सरपंचांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

रत्नागिरी:- तालुक्यातील विल्ये येथील माजी सरपंचांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील एका अंशकालीन स्त्री परिचर महिलेकडून दोन लाख घेऊन ते परत न देता तिला अश्लील शिवीगाळ केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संबंधित अंशकालीन स्त्री परिचर महिलेने याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारी नुसार माजी सरपंच सुवेज सिताराम कांबळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित सुवेज कांबळे हा पीडित महिलेच्या पतीचा मित्र होता. पतीच्या मृत्यूनंतर त्यांची पेन्शन चालू होण्यासाठी त्याने पीडित महिलेला मदत केली होती. पतीच्या मृत्यूनंतर विम्याचे पैसे मिळाल्याचे सूवेज कांबळे याला माहीत होते आणि म्हणूनच सूवेज याने पीडित महिलेकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. पीडित महिलेने सुवेज याला एकूण दोन लाख रुपये ओळखीवर दिले. यापैकी केवळ दहा ते पंधरा हजार रुपये सुवेज याने पीडित महिलेला परत केले.

दरम्यान पीडित महिला आजारी असताना तिने सुवेज याच्या मोबाईलवर फोन करून पैश्यांची मागणी केली असता त्याने पीडित महिलेला अत्यंत खालच्या शब्दात शिवीगाळ केली. तसेच घरी येऊन मुलांसोबत देखील शिवीगाळ केली अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. उपचारा नंतर देखील पैश्यांची मागणी केली असता सुवेज याने शिवीगाळ व धमकी दिल्याने पीडित महिलेने ही बाब त्यांच्या समाजातील काही लोकांच्या कानावर घातली. यावेळी झालेल्या बैठकीत देखील सुवेज याने पैशांबाबत उडवाउडवीची उत्तरे देत पीडित महिलेची बदनामी केली. या प्रकरणी पीडित महिलेने ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आसून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.