विमानातील सीटसाठी गमावले 77 हजार रुपये

रत्नागिरी:- ट्रॅव्हल्स कंपनीतून बोलत असल्याची बतावणी करत विमानातील सिट जवळ -जवळ मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रौढाची सुमारे 77 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली.ही घटना सोमवार 4 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वा.घडली असून अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अरविंद रमेश अस्थाना (48,रा. सिध्दीविनायक सोसायटी जे.के. फाईल्सजवळ, रत्नागिरी) यांनी बँकेत पत्रव्यवहाराव्दारे खात्री करुन सोमवारी रात्री उशिरा ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, अरविंद अस्थाना यांनी ‘इज माय ट्रिप’ या ट्रॅव्हल्स कंपनीकडून आपल्यासाठी व आईसाठी दिल्ली ते पटणा विमानाचे तिकिट बुक केले होते.परंतू या बुकिंगमध्ये त्यांची सीट आईजवळ नसल्याने त्यांनी गुगलवर सर्च करुन ‘इज माय ट्रिप’ट्रॅव्हल्स कंपनीचा नंबर मिळवून त्यावर फोन करुन सीट जवळ-जवळ मिळण्याकरता सांगितले होते.त्यानंतर लगेचच त्यांना फोन करुन अज्ञाताने मी ‘इज माय ट्रिप’ ट्रॅव्हल्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले.तसेच सीट जवळ-जवळ मिळण्याकरता आपल्याला 10 रुपयांचा एक्स्ट्रा चार्ज लागेल असे सांगून प्ले स्टोअरमधून एनी डेक्स हे अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड करण्यास सांगितले.त्याप्रमाणे अरविंद अस्थाना यांनी अ‍ॅप्लीकेशन डाउनलोड केल्यावर आलेल्या मेसेजवर क्लिक केले.त्यानंतर अस्थाना यांनी बँक खात्यातून नेट बँकिंगचे 10 रुपये पे केल्यानंतर अज्ञाताशी फोनवर बोलत असताना त्यांच्या खात्यातून 76 हजार 950 रुपये ट्रान्सफर झाले.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच अरविंद अस्थाना यांनी बँकेशी पत्रव्यवहार करुन सोमवारी पोलिसांकडे तक्रार दिली.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक मारुती जगताप करत आहेत.