रत्नागिरी:-रत्नागिरीतील विमानतळ विस्तारिकरण प्रक्रिया येत्या सहा महिन्यात मार्गी लावण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक शिरगाव-तिवंडेवाडीतील 33 हेक्टर भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण झाली असून मिरजोळे येथील 6 हेक्टर क्षेत्राची जमीन मोजणी शिल्लक आहे. भुसंपादन करताना रेडीरेकनरपेक्षा अधिक दर मिळवून देण्यासाठी शासनाकडून विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिरगावासीयांना दिले.
रत्नागिरी विमानतळाच्या विस्तारिकरणासाठी आवश्यक भूसंपादनात जमीन मालकांना मिळणारा मोबदला कमी असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण होते. जमीनीचा मोबदला हा केंद्र सरकारच्या अन्य प्रकल्पापमाणेच दिला जावा अशी मागणी शिरगाव-तिवंडेवासियांनी खासदार विनायक राऊत यांच्याकडे केली होती. ग्रामस्थांमध्ये या भूसंपादनाबाबत निर्माण झालेले गैरसमज व संभ्रमावाचे वातावरण दूर करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी (ता. 26) येथील शासकीय विश्रामगृहावर बैठक आयोजित घेतली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, प्रांताधिकारी, तहसिलदार, तटरक्षक दलाचे अधिकारी, एमआयडीसीचे अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीत विमानतळासाठी शिरगाव व मिरजोळे परिसरातील ग्रामस्थांच्या जमिनी घेण्यात येणार आहेत. जागा देण्यासाठी ग्रामस्थांचा विरोध नाही, मात्र त्यासाठीचा दर रेडिरेकनर प्रमाणे ५ हजार ५२५ रुपये इतका आहे. तो अत्यंत कमी असल्यामुळे ग्रामस्थांचा विरोध आहे. जमीन मालकांना योग्य हमीभाव मिळायला हवा अशी मागणी मंत्री सामंत यांच्याकडे केली.
यावेळी मंत्री सामंत यांनी मोबदला वितरणात कोणताही अन्याय होणार नाही असे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनीही दराबाबत सुवर्णमध्ये काढण्यात येईल असे सांगितले. दर खासगीप्रमाणे मिळणार नाहीत. पण या प्रकल्पासाठी मोजणी प्रकिया पूर्ण होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. भूसंपादनाबाबत आवश्यक असलेल्या पुढील प्रकियांचे नियोजन, त्या जागांचा दर यांची निश्चिती करणे शक्य होईल. या प्रकल्पासाठी शिरगाव तिवंडेवाडी परिसरातील ३३ हेक्टर क्षेत्राची मोजणी प्रकिया पूर्ण झाली. मिरजोळेतील ६ हेक्टर क्षेत्राची मोजणी प्रकिया बाकी आहे. ही प्रकिया पूर्ण करून पुढील विस्तारीकरणाचे काम सहा महिन्यात पूर्ण करा अशा सूचना मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या.