रत्नागिरी:-शहराजवळील मिरजोळे येथे होत असलेल्या विमानतळावरुन प्रवासी वाहतूक सुरु करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. या सुविधांसाठी आवश्यक जमीन प्रशासनाने अधिगृहीत केली असली तरीही त्यापोटी देण्यात येणार्या मोबदल्याची रक्कम प्रशासनाकडून जाहीर झालेली नाही. त्यामुळे जागा मालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
रत्नागिरी विमानतळ सध्या तटरक्षक दलाच्या ताब्यात असून, तटरक्षक दलाची विमाने उतरण्यासाठी संरक्षण विभागाकडून अद्यायावतीकरण सुरु आहे. येथील विमानतळाची धावपट्टी चिपी विमानतळाइतकीच लांब असून सुरक्षितही आहे. त्यामुळे तीस वर्षानंतर पुन्हा प्रवासी विमाने सुरु होण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. प्रवासी विमाने उतरण्यासाठी आवश्यक पार्कींग व अन्य सोयीसुविधांसाठी पन्नास एकरहून अधिक जागेची आवश्यकता आहे. शिरगाव-तिवंदेवाडी येथील ग्रामस्थांनी जवळपास पंचवीस एकरहून अधिक जागा देण्याची तयारी दाखवली आहे. ही जागा प्रशासनाने ताब्यात घेतली. तिवंदेवाडीतील जागांबाबतची सुनावणी पूर्ण झाली तर मिरजोळे येथील सुमारे पंचवीस एकरहून अधिक जागेवर प्रशासनाचे नाव लागले आहे. अद्याप तेथील सुनावणी पूर्ण झालेली नाही. प्रांताधिकार्यांकडे दोन सुनावण्या झाल्या असून मंगळवारी तिसरी सुनावणी होणार आहे. परंतु या सुनावणींमध्ये मोबदल्याच्या रक्कमांबाबत कोणतीच चर्चा होत नसल्याने जमीन मालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तिवंदेवाडीप्रमाणेच मिरजोळेतील जागा ताब्यात घेण्याचे गॅझेट झाले आहे. मिरजोळेतील जागा व वारसतपासाबाबत सुनावणी प्रांताधिकार्यांकडे सुरु आहेत.