विनापरवाना सभा, मोर्चा काढल्याप्रकरणी नंदू मोहितेंसह अडीचशे ते चारशे जणांवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- एसटी व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी माळनाका येथील डेपोजवळ सभा आणि माळनाका ते जिल्हाधिकारी कार्यालय असा विना परवाना मोर्चा काढताना मास्क आणि सोशल डिस्टनसिंग न पाळल्याप्रकरणी नंदू मोहिते यांच्यासह अडीचशे ते चारशे जणांवर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत राजेंद्र फुटक यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार नंदकुमार धोंडु मोहिते, राजीव यशवंत कीर, नरेश सदाशिव जाधव, रमेश गोविंद केळकर, सचिन नारायण वायंगणकर, सुभाष धर्मा कांबळे व सुमारे ६० विदयार्थी , विदयार्थीनी व नागरीक असे सुमारे २५० ते ४०० जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यातील आरोपीत यांनी २५० ते ४०० लोकांचा जमाव गोळा करुन यामध्ये कोणत्याही प्रकारची वैदयकीय तपासणी न करता तसेच मास्क न करता मोर्चामध्ये सहभागी झाले. सहभागी जमावाने सोशल डीस्टन्सचे देखील पालन केले नाही. जमलेल्या जमावामध्ये कोरोना बाधित असू शकतो याची जाणीव असुनही कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सभा व मोर्चा आयोजित करुन सभा ठिकाणी स्पिकर लावून विभागीय कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरीपर्यंत असा मोर्चा काढला. कोरोना विषाणु संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू शकतो याची माहिती असताना सुद्धा जनसमुदाय जमवुन हयगयीची कृती केली, तसेच मा . जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी जारी केलेल्या मनाई आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.