विनानोंदणी व्यवसायाला मज्जाव; परवाना नसल्यास होणार कारवाई 

रत्नागिरी:-  सर्व अन्न व्यावसायिकांना त्यांच्या विक्री बिलावर परवाना क्रमांक, नोंदणी क्रमांक नमूद करणे बंधनकारक केले आहे. सर्व ग्राहकांनी विक्री बिलावर परवाना किंवा नोंदणी क्रमांक नमूद असलेल्या नोंदणीकृत आस्थापनांकडून अन्न पदार्थ खरेदी करावेत. अन्न, व्यावसायिकांनी विनापरवाना अथवा विना नोंदणी व्यवसाय करु नये व त्वरित अधिकृत संकेतस्थळावर नोंदणीसाठी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

दि .१ ते दि .७ ऑक्टोबर अखेर विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून, सर्व अन्न व्यावसायिकांनी त्यांच्या उलाढालीनुसार आवश्यक परवाना किंवा नोंदणी घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याची सूचना केली आहे. सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन (म. राज्य) रत्नागिरी या कार्यालयात अन्न व औषध परवाना धारकांच्या सुविधेसाठी माफक दरात सेतू सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या सेतू सुविधा केंद्राचा अन्न व औषध व्यावसायिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ हा दि. ५ ऑगस्ट २१ पासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लागू करण्यात आला असून, या कायद्याचा प्रमुख उद्देश मानवी सेवनास सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हाच आहे. परवाना नसल्यास कलम ६३ नुसार विना परवाना व्यवसाय केल्यास ६ महिन्यांपर्यंत कारावास व ५ लाखापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.