विद्युत पोल पडलेले तरीही गावे झाली प्रकाशमान 

महावितरणने वापरला नवा फंडा यशस्वी 

रत्नागिरी:- चक्रीवादळात देखील महावितरणने युद्धपातळीवर काम करत वीज पुरवठा पूर्ववत केला. जिल्ह्यात बहुतेक खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत झाला आहे. महावितरणच्या या कामाचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही 764 विद्युत खांब कोलमडले आहेत. पर्यायी व्यवस्था करीत महावितरण कंपनीने अंधारलेली गावे प्रकाशमय केली आहेत.

विद्युत पुरवठा सुरळीत ठेऊन येत्या काही दिवसांमध्ये कोलमडलेले खांब उभे करणार आहे. या काळात दुरुस्तीचे साहित्य बाहेरील जिल्ह्यातून तातडीने आणून वीज पुरवठा सुरळीत करून दिलासा दिला. सोमवारपर्यंत (ता. 24) सायंकाळपर्यंत 6 पर्यंत बाधित झालेल्या 1 हजार 239 गावापैकी 1 हजार 236 गावातील वीज पुरवठा सुरू करण्यात आला आहे. आता अत्यंत दुर्गम, डोंगराळ भागातील केवळ 3 गावे शिल्लक आहेत. एकूण 55 उपकेंद्रांपैकी सर्वच्या सर्व सुरू आहेत. 7 हजार 548 रोहित्रापैकी 7 हजार 536 सुरू झाले असून केवळ 12 रोहित्र दुरुस्त होणे बाकी आहेत. जिल्ह्यातील एकूण 5 लाख 54 हजार 921 वीज जोडणीपैकी 5 लाख 52 हजार 611 जोडणी सुरू झाल्या आहेत. केवळ 2 हजार 310 जोडणीधारक अजून अंधारात आहेत.
जिल्ह्यात उच्च दाब वाहिन्या असलेले 519 विद्युत खांब बाधित झाले होते. त्यापैकी 392 उभे करण्यात आले आहेत. 127 खांब अजून कोलमडलेले आहेत. लघुदाब वाहिन्यांचे 1 हजार 410 विद्युत खांब बाधित झाले. त्यापैकी 773 खांब उभे करण्यात आले. अजूनही 637 विद्युत खांब कोलमडलेले आहेत. म्हणजे जिल्ह्यात अजूनही 764 विद्युत खांब कोलमडलेले आहेत.  ते उभारण्यासाठी काही दिवस जाण्याची शक्यता असल्याचे महावितरण कंपनीने सांगितले.