रत्नागिरी:- शालेय विद्यार्थ्यांना दोन वर्षांपासून एकच गणवेश मोफत दिला जात होता. मात्र, आगामी शैक्षणिक वर्षापासून प्रत्येक विद्यार्थ्याला दोन गणवेश दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील ५१ हजार ९९० मुलांच्या गणवेशासाठी प्रतिविद्यार्थी ६०० रुपयांप्रमाणे ३ कोटी ११ लाख ९४ हजारांचा निधी जिल्हा परिषदेकडे जमा करण्यात येणार आहे.
समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गातील सर्व मुली, एससी, एसटी, बीपीएल अंतर्गत समाविष्ट असलेली मुले हे मोफत गणवेशासाठी पात्र असतात. त्यानुसार, शैक्षणिक सत्र २०२२-२३ करिता राज्यातील ३५ लाख ९२ हजार ९२१ विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी 215 काेटी 57 लक्ष रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेलाही मोफत गणवेश खरेदीसाठी निधी लवकरच प्राप्त होणार आहे. त्यानुसार, जिल्ह्यातील ५१ हजार ९९० लाभार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश खरेदी करून दिली जाणार आहेत. प्रत्येक गणवेशासाठी ३०० प्रमाणे एका लाभार्थ्यांसाठी ६०० रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यानुसार, जिल्ह्यासाठी ३ कोटी ११ लाख ९४ हजार रुपये जिल्हा परिषदेला वर्ग करण्यात येणार आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी ५० हजार विद्यार्थ्यांना एकच गणवेश दिला गेला होता. त्यासाठी प्रती गणवेश ३०० रुपयांप्रमाणे १ कोटी ५० लाख रुपये शिक्षण विभागाला वर्ग करण्यात आले होते. या रकमेतून संबंधित पात्र विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश खरेदी करून दिला होता. यंदा मात्र दोन गणवेश मिळणार असल्याने विद्यार्थी व पालकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.