रत्नागिरी:- मोबाईलची रेंज सोडाच पण जंगल भागातून डोंगर-कड्यातून मार्ग काढत माचाळला जाणे म्हणजे दिव्यच. मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखल्या जाणार्या लांजा तालुक्यातील या अतिदुर्गम माचाळमध्ये कोरोनाची भिती बाजूला ठेवून 23 विद्यार्थ्यांची ऑफलाईन शिकवणी सुरु झाली आहे. पाऊणतासाची पायपीट करत शिक्षक गावात पोचतात आणि शिकवणी वर्ग घेतात.
माचाळ हा सर्वात दुर्गम भाग आहे. डोंगरातून मार्ग काढत जंगली श्वापदांचे दर्शन घेत तेथे जावे लागते. सध्या माचाळला जाण्यासाठी रस्त्याचे काम सुुरु आहे; परंतु अजुनही गावात जाण्यासाठी डोंगरातून दीड किलोमीटर अंतराची पायपीट करावी लागतेच. माचाळमध्ये सुमारे साडेतिनशेहून अधिक लोकवस्ती आहे. तेथील मुलांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेतच होते. पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात 23 मुले शिक्षण घेत आहेत. दोन शिक्षक नियुक्त केले आहेत. यंदा कोरोनामुळे शैक्षणिक सत्रात खंड पडला आहे. त्याचा फटका माचाळमधील या अतिदुर्गम भागातील मुलांना बसला आहे. जुन महिन्यात सुरु झालेल्या पावसामुळे शिक्षकांना जाणे अशक्यच होते. ज्या ठिकाणी मोबाईलला रेंज नाही, तिथे ऑनलाईन शिक्षण अशक्यच. त्यामुळे ऑफलाईन शिकवणी हाच एकमेव पर्याय होता.प्रतिकुल परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागाने माचाळमध्ये शिक्षण सुरु ठेवण्यासाठी पावले उचलली.
महिन्याभरापुर्वी प्राथमिक शिक्षक सोहन जानबा वांद्रे व राजेभाऊ बाजीराव खंदारे यांनी ऑफलाईन शिकवणीला सुरवात केली. ग्रामस्थांशी संवाद साधल्यानंतर दोन्ही शिक्षक दररोज माचाळला दोन तास वर्ग घेत आहेत. मुलांचे शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि कोरोनाची भिती बाजूला सारत ज्ञान यज्ञ सुरु झाला आहे. गावातील सहाणेजवळील मोकळ्या जागेत सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावून मुलांना शिकवले जाते. दोन शिक्षक असल्याने गर्दी होत नाही. शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी सुधाकर मुरकुटे, संदेश कडव, दत्तात्रय सोपनुर, रविंद्र कांबळे यांनी प्रत्यक्ष माचाळला भेट दिली. मुलांशी संवाद साधत ग्रामस्थांशीही या उपक्रमावर चर्चा केली.