रत्नागिरी:- शिक्षण हक्क कायद्यानुसार 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला नियमित शिक्षण मिळणे आवश्यक आहे. लॉकडाऊन शिथील केल्यानंतर पालकांचे मोठ्याप्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता अधिक आहे. विद्यार्थ्यांचे पालकांसोबतचे स्थलांतर रोखण्यासाठी ‘एक गाव एक बालरक्षक’ मोहीम राबविण्यात येत आहे.
यंदा कोरोनामुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या निर्माण झाली आहे. परिणामी राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात देखील बाधा निर्माण झाली आहे. कोरोनामुळे रोजगाराची समस्या वाढल्याने गावातील मजुरी करणार्यांचे स्थलांतर देखील वाढले आहे. या पालकांसोबत जाणार्या विद्यार्थ्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी एक गाव एक बालरक्षक’ मोहीम शासनाने हाती घेतली आहे. यातून कोरोना परिस्थितीत मुले शाळाबाह्य राहू नये यासाठी गावपातळीवर विशेष प्रयत्न केले जाणार आहे.
शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार अधिनियमानुसार तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस विद्यार्थी शाळेत उपस्थित नसेल तर तो शाळाबाह्य ठरतो; परंतु मागील सात महिन्यांपासून शाळांच्या वर्ग खोल्या विद्यार्थीविना बंद आहेत. कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने अनेक कुटुंबे स्थलांतरीत झालेली आहेत. त्यामुळेच विद्यार्थी शाळाबाह्य’ होण्याची दाट शक्यता आहे. शाळाबाह्य मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी 9 जानेवारी 2017 मध्ये तत्कालीन शिक्षण सचिव नंदकुमार यांनी राज्यात बालरक्षक कृती कार्यक्रम सुरु केला. जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रांतर्गत बालरक्षक कृती कार्यक्रम राबविला जात आहे. दरवर्षी नोकरीनिमित्त अनेक पालक परजिल्ह्यात स्थलांतर होतात. पाल्याची गैरसोय होऊ नये, म्हणून पालक त्यांनाही सोबत घेऊन जातात. हे विद्यार्थी कालांतराने शाळाबाह्य’ होतात. त्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी दरवर्षी शिक्षण विभागाकडून प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात विविध ठिकाणी हंगामी वस्तीगृह स्थापन केली जातात. प्रत्येक गाव पातळीवर तसेच तालुक्यात बालरक्षक मोहीम राबविण्यात येते. या मोहिमेत स्थलांतर होणार्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येतो. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह राहाण्याची, जेवणाची सर्व सुविधा केली जाते.