विद्यमान नगरसेवकांची मुदत आज येणार संपुष्टात; अंतिम सभेकडे नजरा

रत्नागिरी:- नगरपालिकेतील विद्यमान नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत आज बुधवारी (ता. 22) संपूष्टात येत आहे. शेवटच्या दिवशी होणारी विशेष सभा गाजणार कि खेळीमेळीत होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात जाहीर होतात; मात्र ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. यासंदर्भात पुढील कार्यवाही सुरु आहे. तोपर्यंत विद्यमान नगरसेवकांची पाच वर्षांची मुदत संपुष्टात आली आहे. त्यानंतर प्रशासकांची नियुक्ती होणार आहे. शेवटच्या दिवशी नळ पाणी योजना मुदत वाढीसह विविध विषय अजेंड्यावर ठेवण्यात आलेले आहेत. सभागृहातील सर्वच नगरसेवकांसाठी ही निरोपाची सभा ठरणार आहे. गेल्या पाच वर्षात रस्ते, नळपाणी योजना हे विषय चांगलेच चर्चेत राहीले होते. सत्ताधारी शिवसेनेविरोधात भाजपकडून आक्रमक भुमिका घेण्यात येत होती. गेल्या काही दिवसात शहरातील काही भागातील रस्त्यांची कामे पूर्ण झाली आहेत. काही भागातील विशेष करुन मध्यवर्ती बसस्थानकाच्या खालील पट्ट्यातील अंतर्गत रस्त्यांची कामे अजूनही सुरु झालेली नाहीत. यावरुन विरोधक सत्ताधार्‍यांना धारेवर धरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे समारोपाची आजची सभा गाजणार की खेळीमेळीच्या वातावरणात होणार याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत.