रत्नागिरी:- जिल्हा परिषदमध्ये नुकतेच माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर मध्ये वित्त विभागाच्या आस्थापनेवर आलेल्या कर्मचा-यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती कार्यालयात बदली व पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली. अशा कर्मचा-यांचे पूर्वीच्या कार्यालयाकडून त्यांना वेळीच सोडण्यात आले आहे. त्यांचे मासिक वेतन वेळच्या वेळेवर होण्यासाठी वेतनाच्या ऑनलाईन सिस्टीममधून सुध्दा त्यांना वेळीच सोडण्यात आलेले आहे. परंतु ज्या कार्यालयाच्या आस्थापनेवर ते हजर झालेले आहेत त्यांना ऑनलाईन पध्दतीने पगारबिलात सामावून घेण्याची कोणतीच कार्यवाही काही कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळे झालेली नाही. सबब नव्याने पदस्थापना देण्यात आलेल्या कर्मचा-यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन मिळालेले नाही तसेच डिसेंबर या महिन्यांचे वेतन मिळणार नाही. २ महिन्याचे वेतनापासून ते कर्मचारी काम करुनसुध्दा वंचित राहणार आहेत.
याबाबत संबंधित कर्मचा-यांनी आपले सहकर्मचारी पगारापासून वंचित आहेत त्यांना वेळीच पगार कसा मिळेल याबाबत कोणतीही दखल घेतलेली नाही. जे कर्मचारी २ महिने पगारापासून वंचित आहेत त्यांना काम करुन सलग २ महिने वेतन नाही म्हणून प्रचंड नाराजीचे वातावरण असून नाहक मनःस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा परिषद कर्मचा-यांमध्ये कोणालाच कोणाची पडलेली नाही असे वातावरण आहे. ज्या कर्मचा-यांच्या निव्वळ वेतनावर त्यांचे कुटूंब अवलंबून आहे त्या कुटूंबानेही उपासमार सहन करावी का? ज्या कर्मचा-यांचे वेतनातून बँकचे हप्ते सुरु आहेत त्यांनी हप्ते थकले म्हणून दंड सहन करावा का? अशी कर्मचारी वर्तुळात चर्चा सुरु आहे.
नवीन वर्षात गेल्या २ महिन्यांचा पगार नाही ही नवीन वर्षाची भेट आहे की काय असे कर्मचारी वर्गातून उपरोधिक व संतापाने बोलले जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिका-यांनी याची दखल घेणे गरजेचे आहे. अशा पगारापासून वंचित राहिलेल्या कर्मचा-यांच्या बाबतीत बरिष्ठ अधिकारी कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिलेले आहे.