रत्नागिरी:- मोबाईल आल्यावर इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने रक्कम भरणे, वीज, पाणी, फोन बील नागरिक भरताना दिसतात. कॅशलेस पद्धत आली पण चक्क वीज बील तोडण्याची नोटीस पाठवून एका महिलेकडून चक्क ९४ हजार २०० रुपये डेबीट करण्यास सांगून फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मिश्रा नामक व्यक्ती (नाव, गाव, पत्ता माहिती नाही) असा संशयित आहे. ही घटना १५ जूनला २०२४ सकाळी साडेनऊ ते दुपारी एक या कालावधीत एसबीआय कॉलनी मजगाव रोड येथे घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सौ. माधुरी हेमंत चितळे (रा. विश्रांत ७४७ एक्स-२ एसबीआय कॉलनीजवळ, मजगाव रोड रत्नागिरी) या घरी असताना संशयिताने त्यांच्या मोबाईलवर
विज कनेक्शन तोडण्या बाबतचा एसएमएस टाकला त्या एसएमएसवर असलेल्या मोबाईल नंबरवर सौ. माधुरी चितळे यांनी फोन केला असता फोन उचलणाऱ्या व्यक्तीने आपण मिश्रा बोलत असल्याचे सांगितले. तसेच आपण विज विभागातील अधिकारी असल्याचे व तुमचे वीज कनेक्शन तोडले जावू नये, तसेच दंड भरावा लागू नये यासाठी आपण मदत करणार असल्याचे सांगितले. त्यावर विश्वास ठेवून चितळे यांनी संशयिताच्या युपीआयडीवर गुगल पे च्या माध्यमातून ९४ हजार २०० रुपये डेबीट करण्यास लावून सौ. माधुरी चितळे यांची फसवणूक केली.
या प्रकरणी सौ. चितळे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी भादवी कलम ४२० व माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ ड प्रमाणे मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.