लांजा:-विजेचा जोरदार शॉक लागून एका ४५ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लांजा तालुक्यातील कुवे मावळतवाडी येथे गुरुवारी ७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुवे मावळतवाडी येथील प्रकाश शाम नेमण (४६ वर्षे) यांच्या नवीन घराचे काम सध्या सुरू आहे. गुरुवार दि. ७ मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास अचानक लाईट गेल्याने प्रकाश नेमण हे जुन्या घराचा लाईटचा मीटर काढून ज्या दुसऱ्या जागी बसविलेला होता त्या लाईटच्या बोर्डवरून नवीन घराच्या बोर्डमध्ये वायर टाकून लाईट घेत होते. याचदरम्यान गेलेली लाईट अचानक आली आणि प्रकाश नेमण यांना जोरदार विजेचा धक्का बसला. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या या अपघाती दुर्दैवी मृत्युने कुवे मावळतवाडीवर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटने प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भालचंद्र रेवणे हे करत आहेत.