‘विकेल ते पिकेल’साठी पाच जिल्ह्यांची निवड

रत्नागिरी:- ‘विकेल ते पिकेल’ या महत्त्वाकांक्षी कृषी प्रकल्पासाठी कोकणातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पाच जिल्ह्यांची निवड झाली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात आंबा, काजू, लाल व सेंद्रीय भात, कोकम, रोपवाटिका, फळप्रक्रियाला चालना देण्यात येणार आहे. शेतकरी ते ग्राहक साखळी निर्माण करुन दलालांना दे धक्का देण्याचा उद्देश आहे. चार वर्षात त्या-त्या उद्योगाखालील क्षेत्र आणि उत्पादन वाढविण्यासाठी शेतकरी, उद्योजकांना अनुदान दिले जाणार आहे. महसूली मंडळात पाचशे हेक्टरचे क्लस्टर उभारले जाणार आहे.

उद्योगक्षम शेती व गुणवत्तापूर्ण उत्पादन हे पुढील चार वर्षात कृषि विभागाचे प्रमुख उद्दिष्ट राहील अशा सुचना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंडळस्तरावर नियोजन केले जात आहे. रत्नागिरीत कृषी अधिकार्‍यांनी बैठक घेऊन तयारी सुरु केली आहे. यावेळी उपविभागिय कृषी भाग्यश्री नाईकनवरे, तालुका कृषी अधिकारी व्ही. एम. हेगडे यांच्यासह मंडळ कृषी अधिकारी उपस्थित होते. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात उत्पादीत होणार्‍या आंबा, काजू, लाल भात/सेंद्रीय भात, ओले काजूगर, कोकम, फळप्रक्रिया, रोपवाटिका व्यावसायाल चालना दिली आहे. या प्रमाणेच अन्य चार जिल्ह्यात वेगवेगळ्या उद्योगांचा समावेश आहे. प्रत्येक महसूली मंडळात 500 हेक्टरचे क्लस्टर केले जाईल. रत्नागिरी जिल्ह्यात 27 मंडळं असून पहिल्या वर्षी सुमारे साडेतेरा हजार हेक्टर क्षेत्रातील उत्पादन वाढणार आहे.

स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी विचारात घेऊन पीक आराखडा करणे, अल्पभूधारक शेतकरी आणि कृषी उद्योजकांना संघटित बाजारपेठत देणे, खाजगी क्षेत्राचा आर्थिक सहभाग घेऊन व्यवस्थापन कौशल्याच्या कृषी व्यवसायासाठी वापर करणे, शेतकरी समुहांना प्रोत्साहन देऊन गटशेती व करारशेतीला प्रोत्साहन दिजे जाणार आहे. गटशेती योजनेत प्रत्येक वर्षी 500 प्रमाणे चार वर्षात 1000 गट स्थापन करुन त्यांची सांगड शेतकरी उत्पादक कंपन्यांशी घातली जाईल. त्यासाठी शेतकर्‍यांना सुविधा देण्यासाठी भरीव अनुदान राज्य शासन देणार आहे.

क्षेत्रासह उत्पादकतेत वाढ जिल्ह्यात आंब्याचे क्षेत्र 66,433 हेक्टर असून उत्पादन 1 लाख 30 हजार मेट्रीक टन येते. 2025 पर्यंत पाच वर्षात ते उत्पादन 4 लाख 52 हजार मे. टनाचे लक्ष आहे. काजूचे सध्याचे क्षेत्र 1 लाख 9 हजार हेक्टर असून 1 लाख 24 हजार मे. टन उत्पादन मिळते. पुढील पाच वर्षात 1 लाख 14 हजार क्षेत्र होईल. भाताचे उत्पादन क्षेत्र 67 हजार हेक्टरवरुन 73 हजार हेक्टरपर्यंत नेण्यात येणार आहे.