रत्नागिरी:- वाहने खरेदी विक्री करण्याचा बहाणा करुन दुसऱ्याच्या नावे असलेल्या चारचाकी वाहने या बॅंकेतून सीझ केलेली असल्याचे सांगून चार जणांची २१ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मात्र वाहने नावावर न झाल्याने हा सारा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिस ठाण्यात संगमेश्वर व खेड येथील दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आदित्य चव्हाण ( रा. कळंबुशी, आरवली, ता. संगमेश्वर ) व मुंतशीर सलीम कोंडविलकर ( रा. सवेणी मोहल्ला खेड) अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना एप्रिल २०२३ ते १६ डिसेंबर २०२३ सायंकाळी सहा च्या सुमारास इको बॅंक, मारुती मंदिर येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयितांनी ओळखीचे ग्राहक यांना आपण चारचाकी गांड्यांचा खरेदी -विक्रीचा व्यवहार करत असल्याचे सांगितले. फिर्यादी व फिर्यादीच्या ओळखीचे स्वप्नील मोहन नाखरेकर, कुंदन राजाराम शिंदे व स्वप्नील पुरुषोत्तम चव्हाण यांनी विकून अनुक्रमे ८ लाख ३५ हजार, ५ लाख २० हजार, ३ लाख ९० हजार व ४ लाख २० हजार अशी एकूण २१ लाख ६५ हजार रुपये स्विकाले. त्यानंतर आरटीओ कार्यालयात गाड्या नावावर करण्यास टाळाटाळ करु लागले. यामुळे तक्रारदार ग्राहक यांच्या मनात मोटार व्यवहाराबाबत शंकेची पाल चुकचुकली. या गाड्यांबाबत चौकशी करण्याचा निर्णय तक्रारदार यांच्याकडून घेण्यात आला. त्यावेळी सौ. नाझीय बांदिरकर यांच्या नावे असेलली मोटार वाहन (क्र. एमएच-०८ एएन ८९३१) ही संशयित आदित्य चव्हाण याने गाडी स्वतःची असल्याचे भासवून स्वतःला मालक दाखवून फिर्यादी यांच्या सोबत नोटरी करुन गाडी मालक सौ. नाझिया मुजाहिद बांदिरकर (रा. कर्ला) यांचीही फसवणूक केल्याचे निदर्शनास आली. परवानगी शिवाय या गाड्यांची विक्री केल्याचे समजले. या प्रकरणी वाहन घेणारे ग्राहक व फिर्यादी महिला यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोघा संशयितांविरुद्ध भादवी कलम ४२० सह ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.