वाहनांची पीयूसी नसल्यास चार हजारांपर्यंत होणार दंड

रत्नागिरी:- प्रदूषणाचे गंभीर परिणाम लक्षात घेता प्रत्येक वाहनाची पीयूसी (Polution Under Control) प्रमाणपत्र काढणे बंधनकारक आहे. वाहनाचे जर पीयूसी प्रमाणपत्र नसेल तर संबंधित वाहनावर थोडा थोडका नाही तर १ हजार ते ४ हजार रुपयांपर्यंत दंड होणार आहे. गेल्या सात महिन्यांत येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने पीयुसी नसलेल्या ४९६ जणांना कारवाई करून ९ लाख ९२ लाखांचा दंड वसूल केला आहे.

दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेतल्या तर वाहनांचा वापर टाळणे अशक्य आहे. वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाहनांच्या इंधनामुळे प्रदूषणात अधिक होत वाढ होत आहे. वाहनांचा वापर करताना कमीत कमी प्रदूषण व्हावे, नियंत्रण व्हावे, यादृष्टीने पीयूसीच्या माध्यमातून वाहनाची कालमर्यादा ओळखण्यास मदत होत असते. अनेक वेळा दुचाकी किंवा चारचाकी वाहनांची पीयुसी काढण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे परिवहन खात्याने दंडाच्या रकमेतही चांगली वाढ केली आहे. त्यामुळे दुचाकीला हजार पासून ते चार चाकी वाहनाला ४ हजारापर्यंत दंडाची तरतुद केली आहे. दुचाकीला पीयुसी काढण्यासाठी ४० ते ५० रुपये खर्च येतो तर चारचाकी वाहनांसाठी ५० ते १०० रुपये खर्च आहे. दुचाकीला दंडाची रक्कम २ हजार तर चार चाकीला ४ हजार रुपये करण्यात आली आहे.