रत्नागिरी:- जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वाहतुकीचे नियम मोडणार्या वाहनधारकांवर विविध कलमांन्वये दंडात्मक कारवाया केल्या जातात. परंतू अनेकदा वाहनचालक वाहनावर आकारण्यात आलेला दंड भरण्यास पुढे येत नाहीत. गेल्या पाच वर्षात वाहतुक शाखेकडून चलनाव्दारे 17 कोटी 27 लाख 95 हजार 650 रुपयांचा दंड आकारण्यात आलेला आहे. त्यातील फक्त 6 कोटी 9 लाख 27 हजार 150 रुपयांचा दंड वसूल करण्यात वाहतुक शाखेला यश आले आहे. तर यातील 785 वाहनचालकांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत.
वाहनधारकांकडून किमान दोन-तीन ऑनलाईन ई-चलन संबंधित वाहनांवर आकारण्यात आल्याचे मेसेजेस आल्यावरही दंडाची रक्कम भरली जात नाही. त्यामुळे अशा वाहनधारकांचा परवाना रद्द अथवा त्यांचे वाहन जप्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी, तीनचाकी ऑटोशिवाय जड वाहने यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कारवाईची मोहिम राबवली जाते. यात वाहनधारकांनी रस्त्यावरील वाहतुकीचे नियम पाळावेत, सोबतच पार्किंगच्या ठिकाणी जागा असेल तिथेच वाहने उभी करावीत, याशिवाय वाहन चालवण्याचा परवाना, वाहनाची कागदपत्रे आणि इन्शूरन्स, पीयुसीसुध्दा जवळ बाळगावी असे नियम सांगितले जातात. मात्र, अनेकजण या नियमांची पूर्तता करत नसल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो. यामध्ये दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालवताना मोबाईलचा वापर, सीट बेल्ट न लावणे, हेल्मेटचा वापर न करणे, नो पार्किंग, ट्रिपल सिट, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, क्षमतेपेक्षा अधिक माल व प्रवासी वाहतुक, कागदपत्रे,इन्शूरन्स, परवाना नसणे, सिग्नल तोडणे आदि. बाबींवर कारवाया करण्यात आल्या आहेत.
वाहनचालकांकडून 11 कोटी दंडाची थकबाकी
सन 2019 ते मार्च 2024 या पाच वर्षांच्या कालावधीत 4 लाख 18 हजार 579 चलनांमध्ये वाहनचालकांवर 17 कोटी 27 लाख 95 हजार 650 रुपये दंड आकारण्यात आला आहे. त्यापैकी केवळ 6 कोटी 9 लाख 27 हजार 150 दंड भरलेला असून तब्बल 11 कोटी 18 लाख 68 हजार 500 रुपयांची थकबाकी आहे.