रत्नागिरी:-एफसीआय (भारतीय अन्न महामंडळ) गोडाउनमधील हमालांच्या वाराईचा विषय काही सुटता सुटेना. ठेकेदार आणि जिल्हा प्रशासनानेही हात वर केल्यानतंर हमालांनी नियमावर बोट ठेवून ट्रकची जेवढ्या टनाची पासिंग क्षमता आहे तेवढेच धान्य भरले जात असल्याने ठेकेदार अडचणीत आहे. तरीही वाराई देण्याबाबत ठोस आश्वासन मिळत नसल्याने एफसीआय गोडाउनमधील धान्य उचल हमालांनी पुन्हा बंद केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धान्य वितरणावर याचा मोठा परिमाण झाला आहे. रास्त धान्य दुकानांमध्ये सर्वसामान्य कार्डधारकांना वेळेवर धान्य मिळेना, अशी अवस्था झाली आहे.
एफसीआय गोडाउनमधील हमालांनी दीड महिन्यापासून धान्य वाराईचा (धान्य उचलीचा अधिकचा खर्च) विषय गाजत आहे. गेल्या वेळी २२ दिवसांचा संप जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या मध्यस्तीने सुटला होता. तेव्हा त्यांनी अन्य मार्गाने वाराई देता येईल का, याबाबत प्रयत्न करणार असल्याचे आश्वसान दिले होते; मात्र त्यानंतरही वाराईवर अजून तोडगा निघालेला नाही. २०१७ पूर्वी वाराईची जबाबदारी ठेकेदारावर होती. धान्य वाहतुकीच्या नवीन ठेक्यामध्ये ठेकेदाराने हमालांना वाराई द्यावी, असा कुठेही उल्लेख नाही. एफसीआय गोदामाचे हे हमाल असल्याने एफसीआय गोदाम प्रशासनाने त्यावर निर्णय घ्यावा, असे जिल्हा पुरवठा विभागाने पत्रही दिले आहे; मात्र त्यावर कोणताही निर्णय न झाल्यामुळे जिल्ह्यातील धान्य वाहतुकीवर याचा परिणाम झाला आहे. गेल्या महिन्यातील धान्यच रास्त धान्य दुकानापर्यंत न पोहचल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय झाली होती.
ठेकेदार, एफसीआय गोदाम किंवा जिल्हा प्रशासनाकडून हमालांच्या मागणीचा विचार झालेला नाही. त्यामुळे त्यांनीही नियमावर बेट ठेवले आहे. ट्रकची जेवढ्या टनाची पासिंग क्षमता आहे तेवढेच धान्य भरले जात आहे. यामुळे ठेकेदार अडचणीत आला आहे. पंचवीस ते तीस टन धान्य ट्रकच्या एका खेपेमध्ये जात होते त्यासाठी आता डबल फेरी मारावी लागत आहे. वाहतूक खर्च वाढल्याने ठेकेदार मोठ्या अडचणीत आहे. तरीही वाराईबाबत विचार होत नसल्याने सोमवारपासून पुन्हा हमालांनी धान्य उचल बंद केली आहे. महिन्याला सुमारे ११ हजार मेट्रिक टन धान्य उचल होते. त्यावर आता परिणाम झाला आहे. काही ट्रकचालकांनी त्याला दुजोरा दिला. आता एफसीआय गोडाउन प्रशासनाने ही वाराई द्यावी, असेही जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.