वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका

मनसेची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी, रस्ते दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी:- शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत रत्नागिरी मनसे पदाधिकाऱ्यांनी आज नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांची भेट घेत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पाऊस पडल्यानंतर पहिल्या पंधरवड्यातच नुकतेच डांबरीकरण केलेल्या रस्त्यांची झालेली दुरावस्था दुर्दैवी असल्याचे तसेच मुख्याधिकाऱ्यांचा कोणताच धाक नसल्याचे मत मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
तसेच गॅसपाईप लाईन साठी खोदण्यात आलेल्या रस्त्यांची दुरूस्ती ही तात्काळ होत नसल्याने पाऊस पडल्यावर सर्व माती रस्त्यावर येऊन नागरिकांना सहन कराव्या लागणाऱ्या त्रासाला ही मनसे पदाधिकाऱ्यांनी आज वाचा फोडली.

मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत कठोर निर्णय घेऊन या वारंवार खड्डे पडणाऱ्या रस्त्यांच्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे अशी मागणी मनसे पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. यावर कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे मुख्याधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले , तसेच लवकरात लवकर हे खड्डे कोल्ड मिक्स तंत्रज्ञानाने दुरुस्त करण्यात यावे अन्यथा येत्या १५ जुलै रोजी रस्त्यांवर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी यांनी दिला आहे.
यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, विभागअध्यक्ष दिलीप नागवेकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, शाखाध्यक्ष मार्विक नारकर, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिश खामकर, माजी तालुकाध्यक्ष सचिन शिंदे आदि पदाधिकारी महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.