वादाचा बदला घेण्यासाठी टॅंकरमध्ये स्फोटके असल्याचा फोन

कांजूरमार्ग येथून तरुणाला अटक; मुंबई पोलीसांची कारवाई

रत्नागिरी:- आरडीएक्स या स्फोटकांनी भरलेला टॅंकर मुंबईवरून गोव्याला जात असल्याचे फोन मुंबई पोलीसांच्या नियंत्रण कक्षाला करणार्‍या निलेश कपिल पांडे याला कांजूरमार्ग येथून पोलीसांनी अटक केली आहे. घोडबंदर रोड येथे निलेश पांडे दुचाकीवरुन जात असताना त्याचा याच टॅंकर चालकांसोबत वाद झाला होता. यातून निलेश पांडे याने टॅंकर चालकाला त्रास देण्यासाठी मुंबई पोलीसांना फोन केल्याचे उघड झाले आहे.मद्याच्या नशेत असताना त्याने हे कृत्य केले आहे.

मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एका व्यक्तीने शनिवारी रात्री १.१० वाजण्याच्या सुमारास दूरध्वनी केला होता. स्वत:ची ओळख पांडे म्हणून सांगणार्या या व्यक्तीने मुंबईतून बोलत असल्याचे सांगितले. एक आरडीएक्सने भरलेला पांढर्‍या रंगाचा टँकर मुंबईतून गोव्याच्या दिशेने निघाला आहे, त्यामुळे दहशतवाद विरोधी पथकाच्या आणि गोवा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती कळवण्यात आली होती.

त्या माहितीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व ठिकाणी नाकाबंदी करण्यात आलेली होती. दूरध्वनी करणार्या व्यक्तीने वर्णन केलेला टँकर संगमेश्वर येथे नाकाबंदी दरम्याने थांबविण्यात आला. त्याची सर्व बाजूने पोलिसांमार्फत तपासणी करण्यात आली. बॉम्ब शोध व नाशक पथकाद्वारे देखील कसून प्राथमिक तपासणी केली. मात्र टँकरमध्ये कोणतीही बॉम्ब, बॉम्ब सदृश वस्तू अगर स्फोटक पदार्थ मिळालेले नाहीत.
या प्रकारानंतर गुन्हे शाखेने दूरध्वनी केल्याच्या संशयावरून निलेश कपिल पांडे याला कांजूरमार्ग येथून ताब्यात घेतले असून त्याला पोलिसांनी अटक केली. घोडबंदर रोड येथे आरोपीच्या दुचाकीवरून जात असताना त्याचा टँकर चालकाविरोधात वाद झाला होता. त्यातून त्याने दूरध्वनी केल्याचे निष्पन्न झाले. आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी १७७, १८२, ५०५(१) अंतर्गत लोकसेवकाला खोटी माहिती दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.