वादळी पावसाने हंगामाच्या सुरुवातीलाच पर्ससिन मासेमारीला खो

हंगामाचे आठ दिवस वाया ; गेजर आणि पेडया माशावर समाधान

रत्नागिरी:- पाऊस आणि वादळी वाऱ्याने पर्ससीन मच्छीमारीला मुहूर्तच मिळालेला नाही. पर्ससीन मच्छीमारी सुरू होऊन ८ दिवस झाले तरी प्रतिकूल वातावरणामुळे तीन दिवस मासेमारी बंद आहे. हंगामाला सुरवात झाल्यानंतर ५० टक्के मासेमारी सुरू झाली होती. त्या मासेमारीला रिपोर्ट (मासे सापडण्याचे प्रमाण) देखील चांगले नव्हते. गेजर आणि पेडवावरच समाधान मानावे लागले. कोरोनामुळे गेल्यावर्षीचा हंगाम वाया गेला, हा हंगाम तरी पुर्ण मिळावा, अशी मच्छीमारांची अपेक्षा आहे.

जिल्ह्यात पर्ससीन नौकांद्वारे होणारी उलाढाल देखील मोठी आहे. खोल समुद्रात ही मासेमारी केली जाते. जिल्ह्यात २७९ पर्ससिन नौका आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर हे चार महिनेच यांना हंगाम मिळतो. मात्र गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळे हा मच्छीमारी हंगाम बंद होती. यावेळी दुसरी लाट आटोक्यात आल्यामुळे सर्व नियमांचे काटेकोर पालन करून १ सप्टेंबरला मासेमारी हंगाम सुरू झाला. पर्ससीनधारकांनी त्यासाठी पूर्ण तयारी केली होती. बेळगाव, कर्नाटक, नेपाळ आधी ठिकाणाहून करारावर खलाशांना आणले आहे. मात्र मच्छीमारांसमोर पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे नैसर्गिक विघ्न असल्याने या हंगामाचा मुहूर्त साधता आलेला नाही.
आठ दिवसांपैकी एक ते दोन दिवसच अनुकूल वातावरणाचे मिळाले. त्यामध्ये ५० टक्के पर्ससीनधारक मासेमारीसाठी समुद्रावर स्वार झाले. परंतु त्यांनाही अपेक्षित रिपोर्ट मिळाला नाही. ज्या काही नौका गेल्या होत्या, त्यापैकी अनेकांना गेजर आणि पेडवा माशांचा रिपोर्ट मिळाला. दर्जेदार सुरमई, पापलेट, सरंगा अपेक्षाप्रमाणे अजून जाळ्यात सापडत नाहीत. मुसळधार पावसामुळे गेली तीन दिवस जिल्ह्यातील १०० टक्के पर्ससिन मासेमारी बंद आहे.