रत्नागिरी:-वादळामुळे कोयनेच्या टप्पा क्र. 3 मधून वीजनिर्मिती बंद झाल्याने कोळकेवाडी धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन ती नियंत्रित करणेसाठी नाइलाजाने कोयना जल विद्युत प्रकल्प टप्पा क्र. 1, 2 व 4 मधील वीजनिर्मिती कमी करावी लागली होती; मात्र या आव्हानांवर मात करत अभियंता, तांत्रिक कर्मचारी यांनी अथक परिश्रम करत तीन तासाच्या आत वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर अहोरात्र पूर्ण केले. त्यामुळे अशा आणीबाणीच्या परिस्थितीत कोयना प्रकल्पामधून वीजनिर्मिती पूर्ववत करणे शक्य झाले.
मुंबई व कोकण किनारपट्टी परिसरात नुकत्याच अनुभवलेल्या तौक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस व वारा यामुळे सह्याद्रीलगतच्या कोयना जलविद्युत प्रकल्प टप्पा क्र. 3 मधील वीजनिर्मिती तांत्रिक बिघाडाने ठप्प झाली होती. हा टप्पा चालू करण्यासाठी आवश्यक वीजपुरवठा करणार्या पेढांबे स्वीच यार्डमधील टीवाय 2 व टीवाय 3 व 4 या वीजवाहिन्या या चक्रीवादळात बंद पडल्या होत्या. त्यानंतर तेथील पर्यायी वीज वाहिन्यामधून वीजपुरवठा चालू करून टप्पा क्र. 3 प्रकल्प तातडीने सुरू करण्यात आला होता; मात्र रात्री सुरू झालेल्या सोसाट्याचा वारा व वादळी पाऊस यामुळे या पर्यायी वीजपुरवठा करणार्या वीजवाहिन्यासुद्धा बंद झाल्या व कोयना प्रकल्प टप्पा क्र. 3 अंधारात गेला.
राज्याच्या शिखर मागणीच्या कालावधीमध्ये वीजपुरवठा करण्यात कोयना जलविद्युत प्रकल्पाचे महत्वाचे योगदान असून, टप्पा क्र. 3 येथे 80 मेगावॅट वीजनिर्मिती करणारे 4 संच आहेत. या प्रकल्पासाठी कोळकेवाडी येथील धरणातील पाणीसाठा वापरला जातो. या धरणामध्ये कोयना टप्पा क्र. 1 व 2 तसेच टप्पा क्र. 4 यथील विसर्ग सोडला जातो. यामुळे धरणाची पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी टप्पा क्र. 3ची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. वादळामुळे निर्माण झालेल्या आव्हानात्मक परिस्थितीतही कोयना प्रकल्पातील वीजनिर्मिती पूर्ववत केल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे तसेच सर्व संचालक यांनी मुख्य अभियंता कोयना जलविद्युत केंद्राचे प्रमुख अजय बामणे यांचे आणि सर्व संबंधित अभियंते, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.