वादळाच्या पार्श्‍वभूमीवर रविवारी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडॉऊन: जिल्हाधिकारी

रत्नागिरी:- जिल्ह्यात रविवारी सकाळपासून सोमवारी पहाटेपर्यत या टप्प्याटप्प्याने या वादळाची तीव्रता जाणवणार असल्याने लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पाच तालुक्यांमध्ये एक दिवसाचे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. नागरिकांनी चक्रीवादळाच्या पार्श्‍वभूमीवर घरातच थांबावे असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.

जिल्ह्यात वादळ रविवारी सकाळी राजापूरमध्ये किनार्‍यावर समांतर जाणार असून  काही गावांतील नागरिकांना स्थलांतरीत केले जाणार आहे. काही ठिकाणी स्थलांतर सुरु करण्यात आले आहे. यासाठी पोलिसांची मदत घेतली जात आहे. नागरिकांना आवाहन केले जात असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले. पुर्णगडजवळ दुपारी 1, रत्नागिरी सायंकाळी 4 वाजेपर्यत, नेवरे सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास, दापोली सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यत वादळ पोहचण्याची शक्यता आहे. ताशी 40 ते 90 किमी प्रमाणे वारे वाहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील 22 गावे, रत्नागिरी तालुक्यातील 25 गावे, गुहागर, दापोली, मंडणगड तालुक्यातील गावांचा यात समावेश असून किनारपट्टीवरील सुमारे 10 किमीपर्यंतच्या भागात जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे. मच्छीमारांना सतर्क करण्यात आले आहे. बाहेरुन आलेल्या खलाशांना शाळांमध्ये स्थलांतरीत केले जाणार आहे.  एनडीआरएफचे टीम आलेली नसून, गरज पडली तर बोलावली जाणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

नुकसान झाल्यास तातडीने मदतीचा हात देता यावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागासह नगर पालिका, नगरपंचायत यंत्रणा सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे. मदत पथकांशीही संपर्क साधण्यात आला असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. रत्नागिरी व गुहागर मधील कोरोना सेंटरमध्ये विजेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी जनरेटर व डिझेलचा पुरेसा साठा करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. लॉकडाऊन असल्याने लसीकरण, तपासणी सर्वच बंद ठेवले जाणार आहे.