रत्नागिरी:- ग्रामसेवकांबद्दल अपशब्दांचा वापर करून वादग्रस्त विधान केल्याबद्दल आमदार संजय शिरसाट यांच्यावर गुन्हा दाखल करा, या मागणीचे निवेदन रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकास्तरावर ग्रामसेवकांच्या वतीने तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व ग्रामसेवकांनी आज काम बंद आंदोलन करत या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.
औरंगाबाद येथे महिला सरपंच परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी ग्रामसेवकांबद्दल अर्वाच्च भाषा वापरली. ग्रामसेवक हे भामटे आहेत. महिला सरपंचांची फसवणूक करतात असे वक्तव्य त्यांनी केले. यामुळे राज्यातील 22 हजार ग्रामसेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. लोकप्रतिनिधी असे वक्तव्य कसे करू शकतात? त्यांना भानावर आणणे गरजेचे आहे. राज्यभर ग्रामसेवक अतिशय प्रतिकूल परिस्थितीत प्रामाणिकपणे काम करीत आहेत. आ. शिरसाट यांनी त्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी असे निवेदनात म्हटले आहे.
आ. शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे ग्रामसेवक तणावाखाली आहेत. त्यांची प्रचंड मानहानी झालेली आहे. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यामध्ये तेढ निर्माण झालेले असून अविश्वासाचे वातावरण तयार झालेले आहे. अशा अपप्रवृत्तीचा बिमोड होणे गरजेचे आहे असेही निवेदनात शेवटी नमूद केले आहे.