रत्नागिरी:- वाढदिवसाच्या बॅनर काढल्याच्या रागातून मिरजोळे गावात दोन गटात जोरदार राडा झाला. जमावाने माजी सरपंच संदीप उर्फ बावा नाचणकर यांच्यासह त्यांच्या बंधूंना मारहाण केली, तर जमावतील एकाने चॉपरने संदीप नाचणकर यांच्या डोक्यात वार केला. शिंदे शिवसेनेच्या दोन गटात हा जोरदार राडा झाल्यामुळे मिरजोळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत संदीप नाचणकर यांची तक्रार घेण्याचे काम शहर पोलिस स्थानकात सुरू होते.
रत्नागिरी शहरानजिक असलेल्या मिरजोळे गावात शिवसेना (शिंदे गट) यामध्येच दोन गट पडले आहेत. पाटीलवाडी येथील तरुणांनी मुख्य रस्त्यावर वाढदिवसाचा बॅनर लावला होता. तो बॅनर संदीप नाचणकर यांनी मंगळवारी सायंकाळी काढला. त्यावरून वाद झाला होता, परंतु चर्चेनंतर तो वाद संपुष्टात आला. काल बुधवारी काही तरुणांनी संदीप नाचणकर यांना एमआयडीसी – माजगाव रोड येथील मुख्य रस्त्यावर बोलावले. बॅनर काढण्यावरून पुन्हा त्यांच्याशी वाद घातला. याच कालावधीत पाटीलवाडीतून मोठा जमाव संदीप नाचणकर यांच्या दिशेने आला. यावेळी संदीप नाचणकर यांचे बंधू ही त्यांना पाहण्यासाठी तेथे आले होते. चर्चा सुरू असतानाच जमावतील एकाने नाचणकर वर हल्ला करा असे सांगतात जमावने हल्ला करून त्यांना मारहाण केली. तर जमावातीलच एकाने धारदारच चॉपरने संदीप नाचणकर यांच्या डोक्यात वार करत त्यांना जखमी केले. तर त्यांच्या बंधूनाही मारहाण करण्यात आली. त्यानंतर जमाव पांगला.
स्थानिकांनी संदीप नाचणकर यांना जिल्हा रुग्णालयात हलवले होते. त्यानंतर ते तक्रार देण्यासाठी रात्री उशिरा शहर पोलीस स्थानकात दाखल झाले होते. बॅनरवरून राडा झाला असला तरी त्यामागे जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीच्या स्पर्धेतून हा वाद उफाळून आल्याचे चर्चिले जात आहे.