वाढत्या थकबाकीचा महावितरणला ‘शाॅक’

जिल्ह्यात महावितरणची ६२ कोटी थकबाकी; अधिकारीही रडारवर

रत्नागिरी:- महावितरण कंपनी थकबाकीमुळे मेटाकुटीला आली आहे. थकबाकीदार वीज ग्राहकांच्याकडे वारंवार विनवण्या करूनही वीज बिल भरले जात नसल्यामुळे वीज जोडण्या तोडण्याची कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून सामान्य कर्मचाऱ्यांना दिले तरी वसुली होत नसल्याने थकबाकीचा आकडा फुगत चालला आहे. जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार २१८ वीज ग्राहकांकडे ६२ कोटी २६ लाख एवढी रक्कम थकीत आहेत. थकबाकीदार ग्राहकांवर कारवाई करण्यास कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

निसर्ग चक्रीवादळ त्यानंतर तौक्ते वादळ आणि त्यातच अतिवृष्टी, महापूर असे महावितरण कंपनीवर सलग नैसर्गिक संकट आले. यामध्ये महावितरण कंपनीचे प्रचंड नुकसान झाले. परंतु महावितरणच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यालय अन्य जिल्ह्यातील कर्मचारी यांच्या सहकार्याने या संकटांवर वेगाने मात करून वीज ग्राहकांना तातडीने वीज पुरवठा पूर्ववत करून दिला. परंतु आता वीज ग्राहकांनी वीज भरणा केंद्राकडे पाठ फिरवल्यामुळे महावितरणची थकबाकी वाढतच चालली आहे. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वारंवार विनंती करूनही ग्राहकांकडून बिल भरण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे आता वीज जोडणी तोडण्याची कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत.

जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार २१८ वीस ग्राहकांकडे ६२ कोटी २६ लाख एवढी प्रचंड रक्कम थकीत झाली आहे. महावितरण कंपनी ही अन्य वीज कंपन्यांकडून वीज विकत घेऊनच ग्राहकाला पुरवत आहे. या पार्श्वभूमीवर कंपनीच्या डबघाईला आलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे थकबाकीदार वीज ग्राहकांवर कारवाई करण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. याच अनुषंगाने झालेल्या शिस्तभंग कारवाईमध्ये नुकतेच वाशिम आणि औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंता यांना निलंबित करण्यात आले आहे. यामुळे वीज देयक थकवणाऱ्या ग्राहकांवर कारवाई करण्यामध्ये कोणतीही कुचराई सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातही वेगाने थकबाकीदारांवर वीज तोडण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरण कंपनीने दिला आहे.