वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना बंदी

अत्यावश्यक कामासाठी प्रवेश हवा असल्यास कोरोना चाचणी निगेटिव्ह असणं आवश्यक

रत्नागिरी:- जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या प्रशासकीय कामकाजाचं मुख्य ठिकाण असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात अभ्यागतांना येण्यास बंदी करण्यात आली आहे. अगदी अत्यावश्यक कामासाठी प्रवेश हवा असल्यास कोरोना चाचणी करून घेणं आवश्यक असून, चाचणी निगेटिव्ह असल्यासच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. तशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर लावण्यात आली आहे. 

जिल्ह्यात सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नवा उच्चांक होत आहे. त्यामुळे आता शासकीय कार्यालयात सुद्धा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वेगेवगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. दरम्यान काही दिवसांपुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील ३८ कर्मचारी कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातही योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.  रत्नागिरी जिल्ह्याधिकारी कार्यालय अभ्यागतांसाठी बंद करण्यात आलं आहे. इतर कुठल्याची अत्यावश्यक कारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात यायचं असेल तर आरटीपीसीआर किंवा अँटिजेन चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. हि चाचणी निगेटिव्ह आली तर आणि तरच अशा व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश मिळणार आहे. तशी सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य गेटवर लावण्यात आली आहे. दरम्यान यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा असा निर्णय घेण्यात आला होता.