रत्नागिरी:- उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात 91 गावातील 172 वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. आतापर्यंत 1 हजार 15 फेर्यांनी 36 हजार 344 लोकांना पाणी देण्यात आले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे यंदा गतवर्षीपेक्षा 38 अधिक वाड्यांना टंचाईची झळ बसलेली आहे. मोसमी पाऊस लांबला तर टंचाईची तिव्रता अधिक वाढणार आहे.
फेब्रुवारीच्या दुसर्या पंधरवड्यापासून उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. अधूनमधून अवकाळी पाऊस पडला तरीही त्याचा उपयोग टंचाई टाळण्यासाठी झालेला नाही. दिवसेंदिवस टँकरची मागणी वाढू लागली आहे. उष्णतेमुळे भुगर्भातील पाणीपातळी मोठी घट होत असून नद्या-नाले, विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत. पाण्यासाठी लोकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे. राजापूर तालुका वगळता अन्य सर्व तालुक्यांना टँकरची गरज भासत आहे. सर्वाधिक टँकरची मागणी खेड तालुक्यात 54 वाड्यांमध्ये तर त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यात 47 वाड्यांमध्ये आहे. अजुनही प्रत्येक तालुक्यात गावे, वाड्यांमधून टँकरची मागणी होत आहे. प्रशासकीय मान्यता मिळवण्याच्या प्रक्रियेमुळे प्रत्यक्षात टँकर सुरु करता आलेला नाही. यावर्षी भुजल विभागाकडून झालेल्या मार्च महिन्यातील पाणीपातळी मोजणीमध्येही अनेक ठिकाणची पातळी खालावल्याचे दिसून आले होते. त्यामुळे टंचाईची तिव्रता अशीच राहील असा अंदाजही वर्तविलेला होता. सध्या जिल्ह्यात 91 गावातील 172 वाड्यांध्ये 4 शासकीय 12 खासगी टँकरने पाणी दिले जात आहे. 36 हजार 344 लोकांना टँकरचा आधार असून आतापर्यंत 1 हजार 15 फेर्या झाल्या आहेत. गतवर्षी याच कालवधीत जिल्ह्यातील 72 गाव 134 वाड्यात 11 टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. सुमारे 23 हजार लोकांना पाणी दिले गेले. यंदा मोठी भर पडली असून तेरा हजार अधिक लोकांना टंचाईची झळ बसली असून टँकरद्वारे पाणी घ्यावे लागत आहे.